सहसंपादक अनिल बोराडे
अश्रूंची श्रद्धांजली
आज, दि. २४/०४/२०२५ रोजी नाशिक येथे एका महान व्यक्तिमत्त्वाचे, कै. बापूसाहेब संभाजीराव पगारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ज्या बापूसाहेबांनी आपले जीवन झाडपाल्याशी, शेतीमातीशी आणि राजकारणाशी घट्टपणे बांधले होते, ते नेहमी कुसुमाग्रजांच्या शब्दांची आठवण करून देत: "साथ सोबत लागते कोणाला, माझेच आभाळ, माझीच धरती, वादळ घेऊन चाललो खांद्यावरती". हे शब्द त्यांच्या अंतरंगात खोलवर रुजले होते.
बापूसाहेब म्हणजे करुणा आणि ममतेचा सागर होते, तर त्यांच्या अर्धांगिनी, सौभाग्यवती पुष्पलताताई या ज्ञानाची सरिता होत्या. या उभयतांचे जीवन अनेक संकटातून तावून सुलाखून निघाले, आणि त्यांचे शुद्ध सोन्यासारखे तेजस्वी जीवन सर्वांसाठीच एक आदर्श आणि प्रेरणास्रोत होते.
आज केवळ पगारे कुटुंबावरच नव्हे, तर शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतील अनेकांचा आधारवड हरपला आहे. एक मौल्यवान ठेवा, एक प्रेमळ मार्गदर्शक आज आपल्यातून कायमचा निघून गेला. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे, तर त्यांची असंख्य नातीगोती शोकसागरात बुडाली आहेत. बापूसाहेबांच्या अचानक जाण्याने पगारे परिवार आतून पार तुटला आहे, कारण ते या कुटुंबाचे अनमोल रत्न होते.
![]() |
कै.बापुसाहेब संभाजीराव पगारे |
ॲडव्होकेट बापूसाहेब संभाजीराव पगारे हे एक आदर्श संस्थाचालक, प्रभावी वक्ते, ख्यातनाम लेखक आणि उत्कृष्ट कवी म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांना "ज्ञान सिंधू रत्न" पुरस्कार, "पिंपळनेर रत्न पुरस्कार" आणि आदर्श संस्थाचालक पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे हे दुःखद निधन अनेक हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे.
बापूसाहेबांच्या पश्चात त्यांच्या सहधर्मचारिणी, तीन बंधू, भावजाया, तीन भगिनी, मेहुणे, एक सुपुत्र, दोन सुकन्या, सून, जावई आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे.
कै. बापूसाहेब संभाजीराव पगारे यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना! भावपूर्ण आदरांजली अशा महान व्यक्तिमत्वाचा पुरुषाला पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचा वतीने व नवापूर गर्जना न्युज चॅनल नेटवर्क व न्युज वेब पोर्टल चा सर्व प्रतिनिधी आणि संपादक, सहसंपादक यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
Post a Comment
0 Comments