सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतो. तालुक्यातील शेतकऱ्यांचे बहुतांश आर्थिक गणित कांदा उत्पादनातून साधत असतो. परंतु ऐन कांदा काढणीच्या मुहुर्तावरच बाजारात कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सातशे ते आठशे रुपये पर्यंत खाली आले आहेत. कांदा लागवडीच्या भांडवलापोटी घेतलेली उचल फेडण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात कांदा विक्री करावा लागणार आहे. परंतु दर कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची ही चिंता लक्षात घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार ऍड गोवाल पाडवी यांना शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली कांदा दराबाबत केंद्र शासनाकडे किमान आधारभूत किमतीच्या गरजेबाबत लक्ष वेधावे, साक्री तालुक्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू करावे अशा आशयाचे निवेदन दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन देताना साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, साक्री शहर अध्यक्ष सचिन सोनवणे, साक्री तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक सुमित नागरे, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी याकूब पठाण, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, माजी जि.प. सदस्य विश्वास बागुल, प्रज्योत देसले, सागर भावसार, दिनेश देसले, प्रकाश राऊत उपस्थित होते.
तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनास अनुसरून खासदार पाडवी यांनी केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत लक्ष घालण्यास विनंती केली. खासदार ऍड. पाडवी यांनी कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना पाठविलेल्या पत्रात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत कांदा खरेदी केंद्र स्थापन करणे, सध्या ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जाणारा शेतकऱ्यांचा कांदा हा नाशवंत माल प्रकारातील असल्याने कांद्याला किमान आधारभूत किमतीची (एम.एस.पी.) गरज कशी आहे हे पटवून दिले आहे. कांद्याला सध्याच्या स्थितीत मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही व त्यातून उत्पादन खर्चही भागू शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढत असून शेतकरी टोकाच्या भूमिका घेऊ शकतात अशी ही भीती त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
कांद्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित साध्य होण्यासाठी नाफेड मार्फत सर्व खरेदी केंद्रांवर थेट कांद्याची खरेदी करण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे कांदा खरेदी करून शेतकऱ्यांमध्ये पारदर्शकता व विश्वास निर्माण करावा असेही आवाहन खासदार पाडवी यांनी पत्रातून केले आहे. दरम्यान कांदा निर्यात शुल्कात कपात केल्याने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे खासदार एडवोकेट पाडवी यांनी आभार मानले आहेत.
Post a Comment
0 Comments