सहसंपादक अनिल बोराडे
आंतरिक तळमळ, समाजाप्रती आत्मीय भाव व दृढसंकल्प असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चैत्राम पवार यांचे कार्य व त्यांना मिळालेला पद्मश्री हा पुरस्कार आहे असे प्रतिपादन रा स्व संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री भय्याजी जोशी यांनी केले.
एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात आयोजित पद्मश्री चैत्रामजी पवार नागरी सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्रामजी पवार प्रमुख अतिथी श्री अंकुशरावजी कदम, श्री चैत्रामजी पवार सत्कार सोहळा स्वागत समितीचे अध्यक्ष श्री अशोक काळे, देवगिरी कल्याण आश्रमाच्या शहर अध्यक्षा सौ.स्वाती पाडळकर यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले,चैत्रामजी सारखी माणसे समाजासाठीच निर्माण झाली आहेत. डॉ आनंद फाटक यांच्या प्रेरणेने चैत्राम पवार यांना ऊर्जा मिळाली आहे. कुणी त्यांना दुसऱ्याने घडवले असे मी म्हणणार नाही. मुळात त्यांच्यातच ते गुण व संस्कार होते ते योग्य वातावरणाने प्रगट झाले. कर्मशीलता ही आपल्या देशाच्या स्वभावात राहिली आहे. कठीण मार्गावर चालायला सुरुवात करावी लागते. नंतर कालांतराने हमरस्ता तयार होतो. पहिले जो चालणारा असतो त्याचे खरे योगदान व कौतुक. चैत्राम पवार यांच्यासारखी माणसे समाजाचे नेतृत्व करतात. जनसमुदाय त्यांचे मागे आपोआप येतो. असे ते याप्रसंगी बोलताना म्हणाले
सत्कारास उत्तर देताना सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्रामजी पवार म्हणाले रा स्व संघ व वनवासी कल्याण आश्रम यांचे या यशामागे मोठे योगदान आहे. हीच यामागील प्रेरणा आहे.हेडगेवार रुग्णालयाची मोठी टीम सहकार्यासाठी बारीपाडा येथे नियमितपणे येते. सर्वांच्या सहकार्याने हे काम उभे राहिले आहे. पुरस्कारासाठी हे काम उभे राहिलेले नाही तर काम अधिक वाढावे या हेतूने हा पुरस्कार दिला जात असावा. हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नसून ग्रामस्थ व संघाचे व कल्याण आश्रमाचे असंख्य कार्यकर्ते यांचा हा सन्मान आहे असे पवार या वेळी म्हणाले.
पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा श्री भैय्याजी जोशी व श्री अंकुशरावजी कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सन्माननिधी देऊन सत्कार करण्यात आला. श्री चैत्रामजी पवार यांच्या पत्नी सौ. विमलताई पवार यांना साडी चोळी देऊन सौ. स्वाती पाडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. श्रीराम पत्की यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंकुशरावजी कदम यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. आनंद फाटक यांनी देवगिरी कल्याण आश्रमाचे जनजाती क्षेत्रातील कार्य व तेथे चालविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
बारीपाडा येथील शाश्वत विकास कार्याची यशोगाथा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरी सत्कार सोहळा स्वागत समितीचे अध्यक्ष श्री अशोकजी काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवगिरी कल्याण आश्रमाच्या शहर अध्यक्षा स्वाती पाडळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास आजगावकर यांनी केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास स्वागत समितीचे सदस्य व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments