सहसंपादक=अनिल बोराडे
पिंपळनेर येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आपल्या भारत देशाला भौतिकशास्त्रामधील पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे डॉ. सी व्ही रमण यांच्या "रामन इफेक्ट' या शोधासाठी 28 फेब्रुवारी 1930 रोजी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले . या ऐतिहासिक कामगिरीबद्दल 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून 1987 पासून आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात मान्यवरांच्या आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी अश्विनी संभाजी भवरे व आशा छोटीराम चौरे यांच्या शुभ हस्ते डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पी आर खैरनार सर होते.
प्रत्येकाने डोळसपणे विचार करून अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधील वैज्ञानिक कार्यकारण भाव शोधायला पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे. अंधश्रद्धांना मूठ माती देऊन विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गातील घडणाऱ्या विविध गोष्टींबद्दल कुतूहल असते या कुतूहलाचे शास्त्रीय दृष्ट्या समाधान जाणकारांनी करून दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा ओळखून त्यांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
हे सर्व करीत असताना विज्ञानाचे दुष्परिणाम होणार नाहीत विज्ञान हे फक्त मानवाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी वापरले पाहिजे विनाशासाठी नव्हे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे हानी होणार नाही याची देखील काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे. असे आवाहन साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष के एस बच्छाव , प्रतिष्ठित व्यापारी तथा हस्ती बँकेचे पिंपळनेर शाखेचे चेअरमन कुंदनमलशेठ गोगड, विज्ञान शिक्षक जे एन मराठे , प्रा प्रवीण खैरनार सर, प्रा अरविंद सूर्यवंशी सर, प्रा श्रीमती करिश्मा गोगड मॅडम, प्रा गौतम गांगुर्डे सर यांनी आपल्या मनोगतातून केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ,गोगड फाउंडेशन पिंपळनेर, यांच्या वतीने विद्यालयाच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेस पिरियोडिक टेबल, विविध शास्त्रज्ञांची माहिती, चार्टस इत्यादींचे डिजिटल बॅनर्स सदिच्छा भेट म्हणून देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव विनायकराव मराठे यांनी या सुसज्ज रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे फित कापून उद्घाटन केले.
तसेच विद्यार्थी ,शिक्षक, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक इत्यादींसाठी अतिशय उपयुक्त असे वर्षभरातील 365 दिवसांचे वैज्ञानिक दिनविशेष व विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध शास्त्रज्ञांच्या जयंती, पुण्यतिथी इत्यादीं विषयी माहिती दर्शविणारे डिजिटल बारकोड सुसज्ज असे "सायन्स अँड इनोवेशन कॅलेंडर" चे तीन संच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या प्रयोगशाळेना सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रराव विनायकराव मराठे, संचालक के एस गांगुर्डे , वाय एस गांगुर्डे , जयेश मराठे, प्राचार्य श्रीमती एस एस पवार , बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉ सतीश पाटील, गोगड फाऊंडेशनचे संचालक अजित गोगड , केंद्रप्रमुख मुकेश बाविस्कर सर , डायटचे प्रशिक्षण केंद्र प्रमुख सुनील जाधव सर, पर्यवेक्षक डी पी कूवर सर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम डी मराठे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल जगताप सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments