नंदुरबार (प्रतिनिधी):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्री. जितेंद्र खवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कलाकारांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या विशेष शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार येथे आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते जितेंद्र खवळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, दिलीप पवार यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
२३ वर्षांची अविरत सांस्कृतिक सेवा
जितेंद्र खवळे हे गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ नंदुरबार जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीत सक्रिय आहेत. पथनाट्य, एकांकिका, दीर्घांक, व्यावसायिक नाटके, गायन, कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा विविध माध्यमांत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रंगभूमीबरोबरच सामाजिक व वास्तवदर्शी विषयांवर आधारित पुरस्कारप्राप्त लघुपट (Short Films) आणि माहितीपटांची (Documentaries) निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
"कलावंतांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणार" – जितेंद्र खवळे
निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना जितेंद्र खवळे म्हणाले की, "नंदुरबार हा आदिवासी बहुल आणि नैसर्गिक समृद्धी लाभलेला जिल्हा असून येथे लोककला व पारंपरिक वारसा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, ग्रामीण व स्थानिक कलाकारांचे मानधन, सन्मान आणि योग्य व्यासपीठाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. पक्षाच्या माध्यमातून या सर्व समस्या शासन दरबारी मांडून कलावंतांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन."
उत्तर महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव
जितेंद्र खवळे यांच्या निवडीचे वृत्त समजताच नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील कलावंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे. राष्ट्रवादी चित्रपट संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री. भटू हरिभाऊ चौधरी, जळगावचे श्री. विक्रमसिंग पाटील, नाशिकचे श्री. प्रशांत महाजन, धुळ्याचे श्री. योगेश निकम यांच्यासह जिल्ह्यातील विविध नाट्य संस्था, लेखक, संगीतकार आणि कलाकारांनी पुष्पगुच्छ देऊन व सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments