साक्री (सहसंपादक: अनिल बोराडे):
माळमाथा परिसरातील रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था, रेंगाळलेली मूलभूत विकासकामे आणि या सर्व गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष याविरोधात अखेर जनक्रोधाचा उद्रेक झाला आहे. माळमाथ्यातील रस्त्यांची तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती करावी आणि प्रलंबित विकासकामांना तात्काळ गती देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, या मुख्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते तथा वासखेडीचे माजी उपसरपंच दीपक जाधव आणि ॲड. युवराज तोरवणे यांच्या नेतृत्वाखाली वासखेडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
रस्त्यांची बिकट अवस्था; नागरिक त्रस्त
माळमाथा परिसरातील प्रमुख तसेच ग्रामीण रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. दररोज ये-जा करताना वाहनधारकांना व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यांवरून चालणेही कठीण होत असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे अनेक अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आश्वासने नको, प्रत्यक्ष काम सुरू करा!
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्ते व इतर मूलभूत सोयी-सुविधांशी संबंधित विकासकामे प्रलंबित आहेत. ग्रामस्थांनी व संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलने केली आणि पाठपुरावा केला; परंतु प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री आश्वासने देऊन वेळ मारून नेली गेली. "आता केवळ पोकळ आश्वासने किंवा तोंडी चर्चेवर आम्ही थांबणार नाही. प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही," असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
ग्रामस्थांचा व विविध संघटनांचा अभूतपूर्व पाठिंबा
या आंदोलनाला माळमाथा परिसरातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांसह ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणस्थळी नागरिकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण परिसरात प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उपस्थित प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ:
या प्रसंगी वासखेडीच्या सरपंच स्वाती सोनवणे, माजी जि. प. सदस्य नितीन सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक बी. पी. पाटील, वंचित बहुजन आघाडीचे आबासाहेब खैरनार, मुख्याध्यापिका के. एस. गायकवाड, सुनील मोहिते, निलेश तोरवणे, प्रहार संघटनेचे जयेश बावा, संजय पाटील, राहुल गवळे, नाना शेलार, राजू कोरडकर, तहानू कारंडे, संजय बहिरम, मोहन जाधव, मधुकर जाधव, विक्रम मुजगे, दिगंबर कुवर, भाईदास कुवर, रवींद्र कुवर, विलास जाधव, प्रतापराव मुजगे, रितेश मुजगे, सागर मुजगे, अविनाश देवरे, सुरेश सूर्यवंशी, जितेंद्र गांगुर्डे, रितेश बागुल, शामकांत मोजगे, बाळकृष्ण मुजघे, कमलेश कुवर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या माळमाथ्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून नागरिकांच्या हक्काचा बनला आहे. प्रशासनाने या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई केली नाही, तर हे आंदोलन संपूर्ण माळमाथा परिसरात अधिक आक्रमक व तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आता प्रशासन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते की पुन्हा आश्वासनांची बोळवण करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.



Post a Comment
0 Comments