Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्री तालुक्यात पावसाअभावी पिके करपली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची सरसकट ५० हजार रुपयांच्या भरपाईसह तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

 साक्री (सहसंपादक- अनिल बोराडे):

पावसाच्या दीर्घ ताणामुळे साक्री तालुक्यातील शेतीपिकांची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) सोळागाव-काटवण परिसरातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर उतरून पिकांची पाहणी केली व पीडित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्याची जोरदार मागणी केली.

सोळागाव-काटवण भागात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने कासारे, छाईल, नाडसे, दारखेल, विटाई आणि बेहड आदी भागांतील शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली. या वेळी शेतकरी गुलाब भामरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील करपलेल्या पिकांची दुरवस्था पदाधिकाऱ्यांनी पाहिली. पावसाअभावी साक्री तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून, उत्पन्नात मोठी घट झाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. वाढता शेतीखर्च, कर्जाचा डोंगर आणि आगामी काळात निर्माण होणारा जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न यांमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.

प्रमुख मागण्या:

 * साक्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा: शासनाने कागदोपत्री आकडेवारीवर न राहता मंडळनिहाय प्रत्यक्ष व खरी पावसाची आकडेवारी विचारात घेऊन वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे आणि साक्री तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा.



 * आणेवारी ४५ पैशांच्या आत लावा: पावसाची आकडेवारी किंवा पैसेवारी कागदावर अधिक दाखवून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींपासून वंचित ठेवू नये, अशी ठाम भूमिका घेण्यात आली.

 * सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी भरपाई: बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी.



 * शैक्षणिक फी माफ व दुष्काळी सवलती लागू करा: बिकट परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी आणि दुष्काळात मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती शेतकऱ्यांना लागू कराव्यात.

तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व शेतकरी उपस्थित

या पाहणी दौऱ्यात जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष गिरीश विश्वासराव नेरकर, सयाजीराव ठाकरे, संदीप भामरे, रवि तोरवणे, गणेश तोरवणे, गुलाबराव भामरे, अशोकराव भामरे, रविंद्र दहिते, सुनील भामरे, मिथुन भामरे आणि पंडितराव भामरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने कागदोपत्री आकड्यांचा खेळ थांबवून शेतशिवारातील कटू वस्तुस्थिती लक्षात घ्यावी आणि साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments