छत्रपती संभाजीनगर (सहसंपादक: अनिल बोराडे):
मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अत्यंत बिकट आणि आर्थिक संकटात सापडला आहे. हातात आलेली पिके वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन मराठवाड्यात 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, तसेच बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देऊन जनावरांसाठी चारा-पाण्याच्या छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिकांचे नुकसान अन् शेतकरी हवालदिल
मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाअभावी शेतीची अवस्था दयनीय झाली आहे. बियाणे, खते, पेरणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता; मात्र पावसाने दडी मारल्याने उभी पिके डोळ्यांदेखत जळू लागली आहेत. उत्पन्नाची कोणतीही आशा उरली नसल्याने शेतकरी कर्जबाजारीपणा आणि वाढत्या आर्थिक ताणाखाली हवालदिल झाला आहे. केवळ कागदी घोषणा न करता शासनाने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शेतकऱ्यांना ठोस आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे रवि वैद्य यांनी स्पष्ट केले.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
* हेक्टरी १ लाखांची मदत: पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना विनाविलंब हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यावर वितरित करावी.
* चारा व पाण्याच्या छावण्या: पिकांसोबतच आता पशुधनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वाळलेल्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच चारा छावण्यांची पूर्वतयारी करावी व स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी.
* प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठवा: प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवाल न बनवता प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि शासनाकडे प्रभावी अहवाल पाठवून मदतकार्याची अंमलबजावणी करावी.
ग्रामीण अर्थव्यवस्था पशुधनावर अवलंबून असल्याने चारा व पाण्याअभावी जनावरांवर कोणतेही संकट ओढवू नये, यासाठी प्रशासनाने आधीच ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्तांनी या संवेदनशील विषयावर स्वतः लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती रवि वैद्य यांनी निवेदनातून केली आहे.


Post a Comment
0 Comments