पिंपळनेर (अनिल बोराडे):
‘वय वाढते, पण मैत्रीचे बंध कधीच जुने होत नाहीत...’ या उक्तीचा सजीव प्रत्यय पिंपळनेर येथे आला. पिंपळनेरची पहिली शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'न्यू इंग्लिश स्कूल'च्या १९७१-७२ च्या तुकडीतील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अनोखा व ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. तब्बल ५५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी, गाण्यांची मैफल आणि हास्यविनोदाने संपूर्ण सोहळा आनंदाच्या उत्साहात न्हाऊ घातला.
आयुष्याची ७१ ते ७२ वर्षे पूर्ण केलेले हे सर्व मित्र-मैत्रिणी काही काळासाठी आपल्या शाळकरी वयात म्हणजेच १६-१७ वर्षांच्या अवखळ टप्प्यावर पोहोचल्याचा भास उपस्थितांना झाला.
गुरुजनांचा सन्मान आणि संस्थेच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य ए.बी. मराठे होते. सोहळ्याचा प्रारंभ संस्थेचे आधारस्तंभ कै. कर्मवीर बंडू बापूजी, अण्णासाहेब एन.के. पाटील, व्ही.के. वाणी आणि कै. सुरेंद्रराव मराठे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाला. तसेच विद्यालयाच्या प्रांगणातील अवघडनाथ महाराजांच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घेण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, पूर्वीची कौलारू शाळा आणि आज उभी असलेली तीन मजली भव्य इमारत पाहताना डोळे भरून आले. आयुष्याला उत्तम आकार देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण गुरुपूजन करण्यात आले.
प्रमुख अतिथी व मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एस.एस. वंजारी, एम.पी. सोनवणे, जी.बी. जगताप, प्राचार्य पी.एच. पाटील, जयेश मराठे, एच.आर. गांगुर्डे, गांगुर्डे सर, शिवानंद दादाजी, भालचंद्र ततार, देविदास चौधरी आणि भालचंद्र कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते.
७१ वर्षांच्या ‘तरुणाई’चा जल्लोष व माहेरची साडी भेट
५५ वर्षांचा काळ लोटला, चेहरे बदलले, केस पांढरे झाले, संसाराच्या व नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पडल्या; तरीही मैत्रीचा तोच जुना उत्साह कायम दिसून आला. जुन्या चित्रपटांतील गाण्यांची रंगलेली मैफल, विनोदी किस्से आणि विविध सादरीकरणांनी उपस्थितांना खळखळून हसवले.
नोकरी-व्यवसायानिमित्त विविध शहरांत स्थायिक झालेल्या मित्र-मैत्रिणींनी सुख-दुःखाची देवाणघेवाण केली. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थिनींचा परिचय करून देत त्यांना ‘माहेरची साडी’ भेट देऊन हे स्नेहबंध अधिक घट्ट करण्यात आले.
आयोजकांचे यशस्वी परिश्रम
५५ वर्षांपासून दुरावलेल्या या मित्र-मैत्रिणींना एका छताखाली आणण्यासाठी देविदास कृष्णा चौधरी, प.पू. भालचंद्र आनंदा ततार, प.पू. शिवानंद दादाजी धुनिवाले, सुभाषचंद्र शिवराम शेठ बधान आणि भालचंद्र कोठावदे यांनी विशेष पुढाकार घेतला. दुपारच्या मिष्टान्न भोजनानंतर दुसऱ्या सत्रातही विविध कार्यक्रम पार पडले. रात्रीच्या स्नेहभोजनानंतर अत्यंत भावूक वातावरणात सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
> “आपण आता विद्यार्थी नसून आजी-आजोबा झाला आहात!” — ए.बी. मराठे
> अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य ए.बी. मराठे म्हणाले, “५५ वर्षांनंतरही आपल्या संस्थेशी असलेले तुमचे नाते आणि आपुलकी पाहून अतिशय आनंद झाला. आपण आता विद्यार्थी राहिलेला नसून आजी-आजोबा झाला आहात. आपल्या भावी आयुष्यात कोणालाही दुःखाचे दिवस येऊ नयेत, सर्वांना निरोगी व सुखी आयुष्य लाभावे हीच सदिच्छा.”
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हर्षदा शेलार आणि प्रा. बी.एस. कोठावदे यांनी केले. शाळा तीच, आठवणी त्याच—फक्त काळ पुढे सरकला, पण मैत्री कधीच वृद्ध होत नाही, हेच या सोहळ्याने सिद्ध केले.



Post a Comment
0 Comments