पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
पिंपळनेर नगरीचे आराध्य दैवत संत समर्थ श्री खंडोजी महाराज यांच्या १९८ व्या नामसप्ताह व यात्रा उत्सवाला यंदा अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक सजीव देखावे, मंदिर दर्शन, पालखी स्वागत आणि भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण पिंपळनेर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून शनिवारी धुळे जिल्ह्याचे माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांनी पिंपळनेर येथे हजेरी लावत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभाग घेतला.
‘जय श्री केदारेश्वर’ सजीव देखाव्याचा शुभारंभ
नगरपरिषद पिंपळनेरचे आरोग्य सभापती डॉ. प्रशांत बागुल यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत कुणाल पाटील यांनी भोई गल्लीतील भोईराज मित्र मंडळ आयोजित ‘जय श्री केदारेश्वर’ या सजीव देखाव्याचे श्रीफळ वाढवून अधिकृत उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण देखाव्याची पाहणी करून देखाव्याची रचना व कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंडळाने घेतलेल्या या पुढाकाराची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
श्री पांडुरंगाचे दर्शन अन् संत-महंतांचा सन्मान
देखाव्याच्या उद्घाटनानंतर कुणाल पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिर संस्थानाला भेट देऊन श्री पांडुरंगाचे भाविक अंतःकरणाने दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर संस्थानाधिपती ह.भ.प. श्री योगेश्वर महाराज देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मंदिर संस्थानाच्या वतीने कुणाल पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांनी शहरातील संत श्री खंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागत तयारीची पाहणी केली व स्वतः पालखी पदयात्रेत सहभागी होत भाविकांसोबत भक्तीमय वातावरणाचा आनंद लुटला.
मान्यवरांची मांदियाळी व भाविकांचा उदंड उत्साह
या धार्मिक सोहळ्यास धुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षवर्धन दहिते, नगराध्यक्षा डॉ. योगिता जितेश चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती राजीव शिरसाठ, डॉ. विनोद कोठावदे, आरोग्य सभापती डॉ. प्रशांत बागुल, प्रज्ञा बाविस्कर, नगरसेवक डॉ. मिलिंद कोतकर, आशा महाजन, माया पवार, मनीषा ढोले, लीलाबाई राऊत, युवा नेते हर्षवर्धन दहिते, समाजसेवक निलेश कोठावदे, गजेंद्र कोतकर, मुकुंद घरडे यांच्यासह विविध सामाजिक व धार्मिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९८ वर्षांचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा
पिंपळनेरच्या संत श्री खंडोजी महाराजांच्या यात्रेला तब्बल १९८ वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. यंदाच्या नामसप्ताहाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. नामसप्ताहाचा भक्तिमय गजर, चौकाचौकांत उभारलेले सजीव देखावे, मंदिरामधील दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि पालखी पदयात्रेतील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे पिंपळनेर नगरीला नयनरम्य स्वरूप प्राप्त झाले होते.
श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा १९८ वा नामसप्ताह उत्सव पिंपळनेरच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.


Post a Comment
0 Comments