सहसंपादक अनिल बोराडे मो.80070 02881
धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलिस शिपाई अविनाश सादरे यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी सकारात्मक अहवाल पाठविण्याच्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पडताळणीनंतर तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
तक्रारीची शहानिशा करून ३ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. यावेळी पोलिस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळेचे पोलिस निरीक्षक पंकज बोचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक पियुष गायकवाड, सहाय्यक पोलिस अधीक्षक सचिन साबळे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

Post a Comment
0 Comments