Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दोंडाईच्यात अन्न औषध प्रशासनाचा धडाका! ५.८९ लाखांचा सोयाबीन तेल साठा जप्त, ऑइल मिलचा परवाना निलंबित

 (सहसंपादक– अनिल बोराडे):

दोंडाईचा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) मोठी धडक कारवाई करत भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने तब्बल ₹५ लाख ८९ हजार ६०० किमतीचा सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून, एका प्रमुख ऑइल मिलचा परवाना थेट निलंबित केला आहे.



संतोष ट्रेडर्सवर धाड: २,९६० किलो तेल जप्त

अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या पथकाने शहादा बायपास रोडवरील 'संतोष ट्रेडर्स' या आस्थापनाची अचानक तपासणी केली. या दरम्यान रिफा सोयाबीन तेल 'साई स्वाद' आणि 'लकी लाईट'चे अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने पथकाने २,९६० किलो वजनाचा रिफा सोयाबीन तेलाचा साठा (किंमत ₹५,८९,०००) तात्काळ जप्त केला.

कमला ऑइल मिलचा परवाना थेट निलंबित

यानंतर पथकाने आपला मोर्चा स्टेशन रोडवरील 'कमला ऑइल मिल'कडे वळवला. येथे 'कमला' शेंगदाणा तेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा कायद्याच्या 'परिशिष्ट ०४' मधील स्वच्छता व सुरक्षेच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्याने, या मिलचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.



इतर ठिकाणीही झाडाझडती आणि नमुने ताब्यात

प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध व्यापारी आणि आस्थापनांवर एकाच वेळी कारवायांचा बडगा उचलला:

 * महावीर ऑइल व दाल मिल (शहादा रोड): येथून शेंगदाणा तेल व 'गोल्ड कॉइन' शेंगदाणा तेलाचे नमुने घेण्यात आले.

 * कैलाश ट्रेडर्स (शहादा रोड): संभार मसाला, सब्जी मसाला, सोनपरी भगर आणि चिंग्स वेज मंचुरियन मिक्स मसाल्याचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले.

 * हॉटेल प्रिंस (नंदुरबार चौफुली): या हॉटेलची झाडाझडती घेऊन तेथील विदेशी मद्याचे (दारू) नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई

कारवाईदरम्यान गोळा केलेले सर्व नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.



ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!

दोंडाईच्यात एकाच दिवशी झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे खाद्यतेल, मसाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments