पिंपळनेर / साक्री | सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरातील शिवाऱ्या डोंगर भागात एकाच ठिकाणी १८ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मृतांची नावे:
पल्लवी अभिमन बहिरम (वय १८, रा. वडपाडा, शेंदवड)
अरुण जेजीराम चौरे (वय २३, रा. मोहगाव, शेंदवड, ता. साक्री)
घटनाक्रम नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांसोबत जेवण आटोपून पल्लवी घरात झोपली होती. मात्र, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ती घरात न आढळल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला.
या शोधादरम्यान, अरुणने मध्यरात्री एका व्यक्तीला पाठविलेला एक संदेश कुटुंबीयांच्या हाती लागला. या सुगाव्यावरून नातेवाईक व ग्रामस्थांनी एकत्र येत शिवाऱ्या डोंगर परिसरात कसून शोध घेतला. त्यावेळी दोघेही डोंगराच्या परिसरात अत्यंत गंभीर व संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
पोलिसांची तत्परता व वैद्यकीय तपासणी
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी ४:३० वाजता दोघांनाही मृत घोषित केले.
* पोलीस नोंद: पिंपळनेर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) मधील कलम १९४ अन्वये नोंद केली आहे.
* तपास अधिकारी: पीएसआय शिरसाठ यांच्यासह एच. एल. ठाकरे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
* पुढील कारवाई: दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आले असून, तहसीलदार कार्यालयाकडे आवश्यक अहवाल पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीसंसमोर मोठे तपासाचे आव्हान
एकाच ठिकाणी तरुण आणि तरुणीचे मृतदेह अशा प्रकारे आढळल्याने या घटनेमागील गूढ वाढले आहे. आत्महत्येचे हे पाऊल त्यांनी का उचलले? यामागे प्रेमप्रकरणाचा वाद आहे की इतर काही कारण? या सर्व बाजू पोलीस तपासात समोर येणार आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, संबंधित व्यक्तींचे जबाब, मोबाईल रेकॉर्ड आणि पुराव्यांच्या आधारे पोलीस आता या प्रकरणाचा वेगाने छडा लावण्याच्या प्रयत्नात आहेत.


Post a Comment
0 Comments