स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘नशेला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार’चा दिला बुलंद संदेश
पिंपळनेर ( सहसंपादक अनिल बोराडे):
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पिंपळनेर पोलीस प्रशासन आणि राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एक भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. तरुणाईने नशेच्या आहारी न जाता शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा मार्ग स्वीकारावा, असा कडक आणि प्रभावी संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या आवारातून रॅलीला सुरुवात झाली. हातात जनजागृतीपर फलक, बॅनर आणि विविध घोषवाक्ये घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
‘नशा सोडा, जीवन घडवा!’ घोषणांनी शहर दुमदुमले
अमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती देणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. ‘अमली पदार्थांना नकार द्या’, ‘नशामुक्त समाज घडवा’, ‘तरुणाई वाचवा, देश वाचवा’ आणि ‘नशेपासून दूर राहा, आयुष्य सुंदर करा’ अशा घोषणांनी पिंपळनेर शहर परिसर दुमदुमून गेला. अमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीचे आरोग्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेला मारक ठरते; त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या विरोधात पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे रॅलीतून पटवून देण्यात आले.
विद्यार्थी आणि पोलिसांचा उत्स्फूर्त सहभाग
या जनजागृती रॅलीत राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलचे सुमारे ४५० ते ५०० विद्यार्थी, शिक्षकवृंद, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड पथकाने शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. रॅली शहरातील प्रमुख चौकांमधून जात असताना पिंपळनेरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थी व पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रॅलीचा शेवट शाळेच्या प्रांगणात करण्यात आला.
उपक्रमात एपीआय नामदेव सहारे यांच्यासह पीएसआय संदीप संसारे, पीएसआय शिरसाठ, पीएसआय मोरे आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नशेच्या गुलामगिरीतून मुक्ती हाच खरा स्वातंत्र्यदिन!
देशाने परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले असले, तरी आज अमली पदार्थांची व्यसनाधीनता ही तरुण पिढीसमोरील मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच नशामुक्त भारताचा संकल्प करत पिंपळनेर पोलीस आणि विद्यार्थ्यांनी ‘नशेच्या गुलामगिरीतून मुक्ती’चा दिलेला संदेश शहरभरात कौतुकाचा विषय ठरला आहे.



Post a Comment
0 Comments