Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर शहरातील वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करा; नवापूर मर्चंट सेवा असोसिएशनचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन


नवापूर (विशेष प्रतिनिधी):

नवापूर शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा (Tripping), कमी-जास्त होणारा व्होल्टेज आणि अनियमित वीजपुरवठ्याची गंभीर समस्या त्वरित सोडवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, या मागणीसाठी नवापूर मर्चंट सेवा असोसिएशनतर्फे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

आश्वासनानंतरही वीज समस्या जैसे थे!

नवापूर शहरात गेल्या काही काळापासून विजेचा लपंडाव सुरू असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर प्रतिकूल परिणाम होत आहे. या समस्येबाबत असोसिएशनने दि. १७ जुलै २०२६ रोजी महावितरणकडे दाद मागितली होती. त्यावर महावितरणच्या नवापूर उपविभागीय कार्यालयाने (पत्र क्र. ०८१७) दि. ३० जुलै २०२६ पर्यंत समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, दिलेल्या मुदतीनंतरही समस्येत कोणतीही सुधारणा झालेली नाही.



व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

लेखी आश्वासन मिळूनही महावितरणकडून ठोस कारवाई न झाल्याने व्यापारी वर्गामध्ये मोठी नाराजी व अस्वस्थता पसरली आहे.

कायदेशीर नियमांचे उल्लंघन?

निवेदनात नमूद केल्यानुसार, वीज अधिनियम, २००३ (Electricity Act, 2003) तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) च्या ‘सप्लाय कोड व परफॉर्मन्स मानकांनुसार’ ग्राहकांना गुणवत्तापूर्ण व अखंडित वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे या मानकांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

महावितरणने दिलेली मुदत संपूनही कोणतीही सुधारणा न झाल्याने, आता पालकमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना संबंधित तांत्रिक बाबींची पाहणी करून शहरात कायमस्वरूपी व सुरळीत वीजपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती नवापूर मर्चंट सेवा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश नरसिलाल अग्रवाल, सचिव विजय मोतीराम बागुल आणि उपाध्यक्ष मंगेश गंगाधर येवले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments