Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्री पोलिसांची मोठी कारवाई; दोन लाखांहून अधिक किमतीचे एमडी (मेफेड्रोन) व डोडा (पॉपी स्ट्रॉ) जप्त, पंजाबमधील आरोपी अटकेत

 सहसंपादक अनिल बोराडे साक्री, दि. ५ ऑगस्ट :

धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत साक्री पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ३ हजार २५ रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) आणि डोडा (पॉपी स्ट्रॉ) हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी पंजाब राज्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना गोपनीय माहिती मिळाली की, शेवाळी (ता. साक्री) गावाजवळील एच. पी. पेट्रोल पंपाशेजारील हॉटेल परिसरात एक इसम एमडी विक्रीसाठी थांबला आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने तत्काळ सापळा रचला. 


पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार मुलकराज वाल्मिकी (वय ४२), रा. मुक्तसर रोड, कोट कापुरा, फरीदकोट, पंजाब असे सांगितले. त्याच्या अंगझडतीदरम्यान विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. 


जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर (किंमत १ लाख ८० हजार रुपये), १.३७७ किलो डोडा (पॉपी स्ट्रॉ) (किंमत २० हजार ६५५ रुपये) तसेच १५८ ग्रॅम डोडा पावडर (किंमत २ हजार ३७० रुपये) असा एकूण २ लाख ३ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. 


या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३२/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध मादक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. 


ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments