पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
वन्यजीवांची शिकार करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना आता कायद्याचा बडगा सहन करावाच लागेल, हे पिंपळनेर वन विभागाने केलेल्या धडक कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सुकापूर (ता. साक्री) शिवारात घोरपडीची शिकार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला वन विभागाने अवघ्या काही दिवसांत शोधून बेड्या ठोकल्या आहेत. साक्री न्यायालयाने सर्व आरोपींना ६ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओ ठरला मुख्य धागा
२१ जुलै रोजी सोशल मीडियावर घोरपडीची शिकार केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याची बातमी मिळताच पिंपळनेर वन विभागाने तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर ही घटना १९ जुलै रोजी सुकापूर (ता. साक्री) येथील गट क्र. ४६४/ब मध्ये सायंकाळी ४ ते ८ च्या सुमारास घडल्याचे निष्पन्न झाले. गुप्त बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वन पथकाने धाड टाकून पाचही संशयितांना ताब्यात घेतले.
‘या’ आरोपींवर गुन्हा दाखल
वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांनी प्रथम अपराध प्रतिवृत्त (W-02/2026) नोंदवून वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम ९, ३९ आणि ५० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
**अटक करण्यात आलेले आरोपी:**
1. **विजय सदा गायकवाड**
2. **प्रकाश (फुगा) दत्तू धुमाळ**
3. **जयेश शामू गायकवाड** (रा. ईदगावपाडा)
4. **महादू वेडूर गायकवाड** (रा. सुकापूर)
5. **संजय नामदेव चौरे** (रा. अलीयाबाद, ता. सटाणा, जि. नाशिक)
न्यायालयात वन विभागाचा युक्तिवाद ठरला प्रभावी
आरोपींना साक्री न्यायालयात हजर केले असता विशेष सरकारी वकील अॅड. अतुल जाधव यांनी वन विभागाच्या वतीने बाजू मांडली. शिकारीचे गांभीर्य, वापरलेली साधने जप्त करणे आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना ६ दिवसांची वन कोठडी सुनावली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक
> ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक मो. बा. नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक वाय. पी. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले, वनपाल, वनरक्षक व मानद वन्यजीव संरक्षक उमाकांत पाटील यांच्या पथकाने पार पाडली.
वन विभागाचा कडक इशारा
> "सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या शिकारी टोळ्यांसाठी ही कारवाई थेट इशारा आहे. अनुसूची-१ मधील प्राण्यांच्या शिकारीसाठी **३ ते ७ वर्षांचा कारावास** आणि **किमान २५ हजार रुपये दंडाची** तरतूद आहे. नागरिकांनी वन्यजीवांच्या शिकारीचे प्रकार आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा."
> — **वन विभाग, पिंपळनेर**
>

Post a Comment
0 Comments