सहसंपादक अनिल बोराडे
धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रोहोड (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व रमेश छगन सुर्यवंशी यांची भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी मोर्चाच्या धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संपूर्ण पश्चिम पट्ट्यातील आदिवासी समाजात कमालीचे नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद या भागात अधिक वाढणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. याच नियुक्ती सोहळ्याचे औचित्य साधून शेकडो आदिवासी युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात या घडामोडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून यामुळे भाजपला पश्चिम पट्ट्यात मोठे संघटनात्मक बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाने दिलेली ही नियुक्ती केवळ एका पदाची नसून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे, अशा भावना रमेश सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केल्या. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचविण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी, पाडा आणि घरापर्यंत पोहोचवून 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांनी सांगितले की, रमेश सुर्यवंशी यांचे संघटन कौशल्य, समाजातील सक्रिय सहभाग आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संवाद ही पक्षासाठी मोठी ताकद ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आघाडी अधिक सक्षम होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा विजयाचा झेंडा अधिक उंच फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी "राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः" या भारतीय जनता पार्टीच्या संस्कारमूल्यांचा उल्लेख करत निष्ठा, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि विकासाची भूमिका अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांतील शेकडो आदिवासी युवकांनी भारतीय जनता पक्षात घेतलेला जाहीर प्रवेश ठरला. पक्षाची विचारधारा स्वीकारून प्रवेश करणाऱ्यांमध्ये कुडाशीचे सरपंच वसंत अहिरे, उंबरठाचे सरपंच संदीप चौरे, शेवगे येथील वंजी पवार, बोदगावचे उपसरपंच लक्ष्मण सुर्यवंशी, कुडाशीचे पांडुरंग साबळे, सुतारे येथील ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल ठाकरे आणि मापलगावचे गोविंदा गावीत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
रमेश सुर्यवंशी यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. याप्रणाली प्रसंगी माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, उपाध्यक्ष चंद्रकांत भैय्या भामरे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष के. टी. सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शैलेंद्र अजगे, पिंपळनेर ग्रामीण मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजू ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, डॉ. पगारिया, धनंजय घरटे, गुलाब चौरे, चंदुभाऊ पवार, कृषी सभापती युवराज ठाकरे आणि रमेश सरक यांच्यासह साक्री तालुक्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराला आता एक नवी गती मिळणार असून आदिवासी भागात भाजपचा जनाधार अधिक भक्कम करण्यासाठी ही घडामोड अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment
0 Comments