**नवापूर (प्रतिनिधी):**
नवापूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बारी नियतक्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्या एका संशयिताला वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. नानजी भाद्या नाईक (रा. बारी, ता. नवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला १० जून २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली असून, वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
### गस्तीदरम्यान मिळाली यश
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी मा. वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर व वनक्षेत्र कर्मचारी नवापूर यांचे पथक संयुक्तपणे नियतक्षेत्र बारी येथील कक्ष क्रमांक ५९ मध्ये गस्त घालत होते. यावेळी जंगलात झाडांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून अवैध वृक्षतोड करणाऱ्या नानजी भाद्या नाईक याला जागीच ताब्यात घेतले.
### गुन्हा दाखल व वनकोठडी
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वनक्षेत्र कार्यालय नवापूर येथे आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आवश्यक ती गुन्हेगारी कागदपत्रे व पंचनामा तयार करण्यात आला. त्यानंतर सोमवार, दिनांक ८ जून २०२६ रोजी आरोपीला मे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय नवापूर यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला १० जून २०२६ पावेतो वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे.
### वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदरची धडक कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:
* **श्रीमती नीनू सोमराज मॅडम** (मा. मुख्य वनसंरक्षक, धुळे)
* **श्री. संतोष सस्ते साहेब** (मा. उपवनसंरक्षक, नंदुरबार)
* **श्री. सदगीर साहेब** (मा. विभागीय दक्षता पथक अधिकारी, धुळे)
* **श्री. रोशन बुवा सर** (मा. सहाय्यक वनसंरक्षक, नंदुरबार)
* **श्री. अमोल काशीकर साहेब** (मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, नवापूर)
या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचूक नियोजनामुळे ही कारवाई यशस्वी झाली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास **वडकळंबीचे वनपाल श्री. ए. एम. शेख** हे करीत आहेत. जंगलातील मौल्यवान लाकडांची तस्करी आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments