Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कुंभारवाड्यात पाणीप्रश्नाला अखेर पूर्णविराम; आरोग्य सभापती डॉ. प्रशांत बागूल व नगरसेविका मनीषा ढोले यांच्या पाठपुराव्याला यश

 **पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):**

येथील प्रभाग क्रमांक ५ मधील कुंभारवाडा परिसरातील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेवक तथा आरोग्य सभापती डॉ. प्रशांत कांतीलाल बागूल आणि नगरसेविका मनीषा संभाजी ढोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील बोरिंगला जलपरी बसविण्यात आली असून, यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून कुंभारवाडा परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी दररोज मोठी भटकंती करावी लागत होती. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने परिसरात तीव्र असंतोष आणि चिंतेचे वातावरण होते. नागरिकांची ही मोठी गैरसोय आणि हालअपेष्टा लक्षात घेऊन आरोग्य सभापती डॉ. प्रशांत बागूल व नगरसेविका मनीषा ढोले यांनी या समस्येची तातडीने दखल घेतली. त्यांनी केवळ कोरडी आश्वासने न देता संबंधित प्रशासकीय विभागाकडे सातत्याने आणि आक्रमकपणे पाठपुरावा सुरू ठेवला.

त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रशासनाकडून मंजुरी मिळवून कुंभारवाड्यातील बोरिंगला जलपरी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जलपरी कार्यान्वित होताच परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून शेकडो नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. "आश्वासन नव्हे, कृती हाच आमचा धर्म!" या भूमिकेतून काम करणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवत विकासकामांना प्राधान्य दिले आहे.

या यशस्वी कामाबद्दल बोलताना आरोग्य सभापती डॉ. प्रशांत बागूल आणि नगरसेविका मनीषा ढोले यांनी सांगितले की, जनसेवा हेच आमचे कर्तव्य असून प्रभागाचा विकास हाच आमचा खरा संकल्प आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध असून, आगामी काळातही लोकहितार्थ तातडीने उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

कुंभारवाड्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर असलेला पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागल्याने संपूर्ण परिसरात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्येवर केवळ चर्चा न करता थेट प्रत्यक्ष कृती करून दाखविल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून डॉ. प्रशांत बागूल आणि मनीषा ढोले यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकप्रतिनिधींच्या या सक्रिय कार्यपद्धतीमुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासाचा एक नवा आदर्श निर्माण होत असल्याची भावना आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments