Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शून्यातून विश्व निर्माण करणारी कावेरी! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले बी.ए. एलएल.बी. परीक्षेत घवघवीत यश

सहसंपादक अनिल बोराडे 

 पिंपळनेर: जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतीही अडचण छोटी ठरते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कु. कावेरी विनायक भवरे हिने दाखवून दिले आहे. अत्यंत हलाखीच्या आणि संघर्षमय परिस्थितीत वाढलेल्या कावेरीने बी.ए. एलएल.बी. परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.

कावेरीचे वडील अत्यंत जिकिरीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत होते. आई-वडील बाजारहाटचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र कोरोनाच्या संकटात हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आणि कुटुंबावर आर्थिक संकटाचे मोठे ढग दाटून आले. अशा कठीण काळात तिची आई होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावत कुटुंबाचा मुख्य आधार बनली. तीन भाऊ-बहिणी, घरातील इतर जबाबदाऱ्या आणि त्यातच निर्माण झालेली मोठी आर्थिक चणचण या सर्व परिस्थितीमध्ये शिक्षण सुरू ठेवणे हेच कावेरीसमोर एक मोठे आव्हान होते.



मात्र या संकटांना शरण न जाता कावेरीने संघर्षालाच आपली ताकद बनवले. दिवस-रात्र मेहनत, दांडगा आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळावर तिने बी.ए. एलएल.बी. ची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिचे हे यश म्हणजे खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखेच आहे.

कावेरीच्या या अभूतपूर्व आणि कौतुकास्पद यशाबद्दल तिचा स्थानिक पातळीवर विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी पिंपळनेर नगर परिषद अध्यक्षा सौ. योगिता जितेश चौरे, सौ. प्रज्ञाताई चंद्रशेखर बाविस्कर, राजूभाऊ शिरसाट, चंद्रशेखर बाविस्कर, संभाजी ढोले, दिनेश जैन तसेच कावेरी यांच्या आजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कावेरीच्या जिद्दीचे आणि संघर्षमय प्रवासाचे भरभरून कौतुक केले तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक विद्यार्थ्यांसाठी तिचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या आणि कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हाच मोलाचा संदेश कावेरीने आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिला आहे. आज कावेरीचे यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून संघर्ष, मेहनत, आई-वडिलांचे त्याग आणि शिक्षणावरील निष्ठेचा हा मोठा विजय मानला जात आहे. तिची ही यशोगाथा समाजातील प्रत्येक युवक-युवतीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments