सहसंपादक अनिल बोराडे
**धुळे:**"रिकाम्या डब्यांपासून ते सन्मानांनी भरलेल्या घरापर्यंतचा प्रवास” अनुभवत संघर्ष, जिद्द आणि समाजकार्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पिंपळनेरच्या संघर्षकन्या **ॲड. रुपाली कन्हैयालाल चौधरी** यांना प्रतिष्ठेचा **"समाजसारथी पुरस्कार २०२६"** प्रदान करण्यात आला. खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, धुळे येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दर पाच वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या भव्य पुरस्कार सोहळ्यात, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक ११ व्यक्तींना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज एकजुटीचा संदेश देणारा हा सोहळा धुळे नगरीत विशेष लक्षवेधी ठरला.
### 'या' अष्टपैलू योगदानासाठी निवड
ॲड. रुपाली चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करताना खान्देश तेली समाज मंडळाने त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची विशेष दखल घेतली. त्यांचे वकृत्व, व्याख्यान, समाजप्रबोधन, विधी जनजागृती, संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार, साहित्यिक लेखन, सूत्रसंचालन आणि युवक मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव करत, अत्यंत कमी वयात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या वकील म्हणून कार्यरत असलेल्या ॲड. रुपाली या शब्दांची ताकद आणि कायद्याची धार यांच्या संगमातून वंचित, पीडित व गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत आहेत.
### भावुक क्षण: "संघर्षाने रडायला नाही, तर लढायला शिकवले"
पुरस्काराला उत्तर देताना ॲड. रुपाली चौधरी अत्यंत भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या,
> "हा पुरस्कार केवळ माझा एकटीचा नाही, तर माझ्या आई-वडिलांच्या त्यागाचा, गुरूंच्या संस्कारांचा आणि समाजाच्या प्रेमाचा सन्मान आहे. संघर्षाने मला रडायला नाही, तर खंबीरपणे उभे राहून लढायला शिकवले. एक काळ असा होता की घरात अन्नाचे डबे रिकामे होते, पण माझी स्वप्नं कधीच रिकामी नव्हती. आज घरात मिळालेल्या सन्मानांना जागा कमी पडतेय, हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पावती आहे. समाजासाठी आणि न्यायासाठी माझे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील."
>
### गुरु-शिष्याच्या नात्याने वेधले लक्ष
या सोहळ्यात ॲड. रुपाली चौधरी यांना घडवणारे, योग्य दिशा देणारे आणि ज्यांची त्या मानसकन्या आहेत, असे पिंपळनेरचे **प्रा. डॉ. डी. टी. पाटील (बल्लक सर)** यांची उपस्थिती विशेष कौतुकास्पद ठरली. मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सीमा पाटील यांनीही रुपाली यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले.
### मान्यवरांची व परिवाराची उपस्थिती
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. कैलास आधार चौधरी, उपाध्यक्ष श्री. जयवंत चौधरी, सचिव श्री. रवींद्र जयराम चौधरी व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी ॲड. रुपाली चौधरी यांचे वडील श्री. कन्हैयालाल चौधरी, श्री. पोपट चौधरी (फागणे), श्री. सोमनाथ महारू चौधरी (चाळीसगाव), आई सौ. छाया चौधरी, सौ. सुवर्णा चौधरी, सौ. योगिता चौधरी यांच्यासह चौधरी परिवार उपस्थित होता. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित शेकडो नागरिकांनी, विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी ॲड. रुपाली चौधरी यांचा वैयक्तिक सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments