सहसंपादक अनिल बोराडे
**साक्री:*महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील बुरुडखे धरणातील गाळ उपसा करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा जाहीर शुभारंभ आज, रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते या लोकोपयोगी कामाचा नारळ फोडण्यात आला.
![]() |
| आमदार सौ मंजुळा गावित |
या अभिनव उपक्रमामुळे बुरुडखे धरणातील गाळ काढून तो ककाणी आणि भडगाव परिसरातील शेतकरी बांधवांना संपूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा थेट फायदा परिसरातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या शेतीला एक नवी संजीवनी मिळणार आहे.
### लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना मोठे यश
बुरुडखे धरण बांधल्यापासून आजतागायत या धरणातील गाळ कधीही काढण्यात आला नव्हता. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली होती. साक्रीच्या कार्यसम्राट आमदार सौ. मंजुळाताई गावित आणि शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत, शासन पातळीवर सातत्याने विशेष पाठपुरावा केला आणि या कामाला मंजुरी मिळवून दिली.
### धरणाची पाणी क्षमता आणि शेतीची सुपीकता वाढणार: आमदार मंजुळाताई गावित
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार सौ. मंजुळाताई गावित म्हणाल्या,
> "बुरुडखे धरण बांधल्यापासून आजवर एकदाही यातील गाळ उपसला गेला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर या धरणाचे गेट बदलणे व इतर काही तातडीच्या विशेष दुरुस्त्या करून घेतल्या होत्या. आता या अभियानांतर्गत धरणात साचलेला सुपीक गाळ थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे."
>
तालुक्यातील इतर धरणांचेही भाग्य उजळणार: डॉ. तुळशीराम गावित
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत केवळ बुरुडखेच नव्हे, तर साक्री तालुक्यातील काबऱ्याखडक, पांझरा मध्यम प्रकल्प, ककाणी, शेवाळी आणि विरखेल या धरणांमधील गाळ काढण्याच्या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी ककाणी आणि शेवाळी येथील गाळ उपसाचे काम सुरू झाले असून, गेल्या दोन दिवसांपूर्वीच तिथल्या शेतकऱ्यांनी हा सुपीक गाळ आपल्या शेतात टाकून घेण्यास सुरुवात केली आहे. बुरुडखे धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता प्रचंड वाढणार असून, परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थिती
या सोहळ्याला बुरुडखे, ककाणी व भडगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गाळ वाहून नेण्यासाठी परिसरातील सुमारे ५० ते ६० शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन स्वयंस्फूर्तीने आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित, परिसरातील ज्येष्ठ नेते श्री. वसंतआप्पा पवार, सोमनाथ भिला गावित, सुभाष चौरे, सुरेश पवार, रमण रामसिंग पवार, रमेश शेवाळे, रामलाल मांगा जगताप, गोटू पुनाजी जगताप, सुभाष रामराव जगताप, भटू गोटू जगताप, गोरख महादू बागुल, गुलाब रामसिंग पवार, उत्तम यशोदा गावित, रामदास पुणाजी सूर्यवंशी, खुशाल पवार, संजय साबळे, प्रकाश गावित यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील प्रेरणा फाउंडेशन व इंडविश वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी दिलीप पाठाडे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणाचा गाळ निघणार आणि पाणीप्रश्न सुटणार असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment
0 Comments