Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

**धुळे पोलिसांची मोठी कामगिरी: 'चड्डी बनियन गँग'च्या प्रमुखाला मध्यप्रदेशातून अटक!**

सहसंपादक अनिल बोराडे 

 धुळे: एम.आय.डी.सी. अवधान धुळे परिसरातील एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात मोहाडीनगर पोलिसांना अत्यंत मोठे यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे आणि परिसरात उच्छाद मांडणाऱ्या कुप्रसिद्ध 'चड्डी बनियन गँग'च्या मुख्य प्रमुखाला पोलिसांनी मध्यप्रदेशातून शिताफीने अटक केली आहे. कुंदनसिंग उर्फ कुंद्या भिकीया डावर (वय ३५ वर्षे, रा. परेठा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.



**काय आहे नेमकी घटना?**

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ३:०० वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. अवधान परिसरातील श्री. अनुराग मोरणकर व विवेक मोरणकर यांच्या मालकीच्या 'एल्मेक इंजिनिअर्स' कंपनीच्या गोदामात अज्ञात चोरांनी प्रवेश केला होता. चोरांनी केबिनच्या ड्रॉवरमधून १,२५,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २८/२०२६ BNS क. ३०५, ३३१(४)) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे करत होते.

**पोलिसांनी असे रचले जाळे:**

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एम.आय.डी.सी. अवधान परिसरात 'चड्डी बनियन गँग' सक्रिय असल्याचे आणि त्यांनीच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. गेल्या दोन वर्षांपासून या गँगकडून होत असलेल्या चोऱ्यांवर कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी मोहाडीनगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विशेष उपाययोजना आखली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि. अशोक पायमोडे व पोलीस अंमलदारांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने अवधान परिसरात सतत पेट्रोलिंग करून आणि विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. चोरांचे वर्णन, त्यांची राहणीमान आणि गुन्हे करण्याची विशिष्ट कार्यपद्धती (Modus Operandi) यांचा सूक्ष्म अभ्यास पथकाद्वारे करण्यात आला.

**मध्यप्रदेशात ८ दिवस ठोकला मुक्काम:**

तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गँग मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने मध्य प्रदेश राज्यात सलग ८ दिवस मुक्काम ठोकून, अथक परिश्रम घेत आरोपींचे अचूक लोकेशन व वास्तव्याबाबत माहिती मिळवली. अखेर परेठा (ता. कुक्षी, जि. धार, म.प्र.) येथून गँगचा प्रमुख कुंदनसिंग उर्फ कुंद्या याला शोधून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने आपल्या इतर साथीदारांसह या घरफोडीची कबुली दिली आहे. सध्या उर्वरित फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

**यांनी केली कामगिरी:**

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे **श्री. विशाल आनंद**, अपर पोलीस अधीक्षक **अजय देवरे**, उ.वि.पो.अ. **राजकुमार उपासे** (धुळे शहर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली; मोहाडीनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक **शिल्पा पाटील**, पोऊनि. **अशोक पायमोडे**, पोऊनि. **नितीन करंडे** आणि पोलीस अंमलदार **निलेश पाटील, ललिता मराठे, दरबारसिंग गिरासे, मनिष सोनगिरे, मयुर थोरात, मुकेश मोरे व भगवान ढाकणे** यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments