**पुणे:*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर केवळ वंचित आणि उपेक्षित समूहालाच मुख्य प्रवाहात आणले नाही, तर या देशातील प्रत्येक नागरिकाला समान दर्जा, संधी आणि न्याय मिळवून दिला. म्हणूनच ते केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नसून, खऱ्या अर्थाने 'सामाजिक न्यायाचे जनक' आहेत, असे प्रतिपादन बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले आहे.
![]() |
| डॉ बाबासाहेब आंबेडकर |
### **समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे घटनात्मक अधिष्ठान**
डॉ. आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना भारताला अर्पण केली. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतून त्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांना घटनात्मक स्थान दिले. आरक्षणासारख्या विशेष तरतुदी करून शोषित आणि पीडित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग सुकर केला. आज सामाजिक न्यायाच्या प्रत्येक चळवळीचा पाया बाबासाहेबांच्या विचारांवरच उभा आहे.
### **स्त्रीमुक्ती आणि शिक्षणाचे अग्रदूत**
डॉ. आंबेडकरांचे कार्य केवळ एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीविरुद्धही मोठा लढा दिला. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहावेळी त्यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. "मुलींना शिक्षण द्या, स्वावलंबी बना," हा त्यांचा संदेश क्रांतिकारी ठरला. हिंदू कोड बिल आणि राज्यघटनेतील तरतुदींच्या माध्यमातून त्यांनी भारतीय स्त्रियांना रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करून समान अधिकार मिळवून दिले.
### **'प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय'**
देशातील जातीव्यवस्था हा सामाजिक एकोप्यासाठी मोठा धोका असल्याचे बाबासाहेबांचे मत होते. त्यांनी 'Annihilation of Caste' सारख्या ग्रंथातून जातीप्रथेच्या निर्मूलनाचा मार्ग दाखवला. "मी प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय" ही राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
### **वंचितांसाठी संरक्षणाची कवचकुंडले**
राज्यघटनेतील कलम ३४०, ३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) विशेष तरतुदी करून त्यांनी त्यांना शोषणाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांमुळेच आज देशातील १४० कोटी जनता सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगत आहे.
> "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे शोषणमुक्त आणि समतामूलक समाजक्रांतीचा रणसंग्राम आहे. त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण लोकशाही आणि समतेची फळे चाखत आहोत."
**डॉ. बबन जोगदंड**, विभागप्रमुख, बार्टी, पुणे (मो. ९८२३३३८२६६)

Post a Comment
0 Comments