Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गरिबीवर मात करत वेदांतची उत्तुंग झेप; नवोदयमध्ये जिल्ह्यात सातवा, तर एकलव्य परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान

 सहसंपादक अनिल बोराडे 

साक्री: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही संकटावर मात करू शकतात, याचाच प्रत्यय साक्री तालुक्यातील मोहाणे येथील विद्यार्थ्याने आणून दिला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या वेदांत छोटू अहिरे (भिल) याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नवोदय प्रवेश परीक्षेत जिल्ह्यात ७ वा आणि एकलव्य निवासी शाळा प्रवेश परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे.



धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मोहाणे हे एक छोटेसे गाव. याच गावातील रहिवासी असलेल्या वेदांतची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या वेदांतला सुरुवातीपासूनच शिक्षणाची ओढ होती. कोणत्याही प्रकारची महागडी खाजगी शिकवणी लावणे कुटुंबाला शक्य नसतानाही, वेदांतने केवळ स्वतःची मेहनत, जिद्द आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपला अभ्यास सुरू ठेवला. त्याच्या या चिकाटीचे फळ आज मिळाले असून, त्याने एकाच वेळी दोन मोठ्या प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवत आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव रोशन केले आहे.



नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत वेदांतने जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळवला आहे, तर एकलव्य निवासी शाळा प्रवेश परीक्षेत त्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या या दुहेरी यशाबद्दल संपूर्ण साक्री तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ठरवले तर ते मोठ्या शहरांतील सोयी-सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकू शकतात, हे वेदांतने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.



वेदांतच्या या यशाबद्दल मोहाणे ग्रामस्थांसह शिक्षक आणि पालकांनी आनंद व्यक्त केला असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments