सहसंपादक अनिल बोराडे
ग्रामीण विकास आणि उद्योजकता यांचा अनोखा संगम नुकताच पाहायला मिळाला. धुळ्यातील सुमारे ६० प्रतिथयश उद्योजकांनी रविवारी आदर्श गाव बारीपाडा येथे विशेष अभ्यास दौरा केला. 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'च्या माध्यमातून आयोजित या दौऱ्याने 'गाव शिकवते आणि शहर शिकते' हा नवा आदर्श घालून दिला आहे.
पद्मश्री चैत्राम पवारांचा प्रेरणादायी संवाद
या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते पद्मश्री चैत्राम पवार यांच्याशी झालेला थेट संवाद. शून्यातून विश्व कसं उभं करायचं आणि निसर्गाचा समतोल राखून गाव कसं स्वयंपूर्ण बनवायचं, याचा वस्तुपाठच त्यांनी उद्योजकांसमोर मांडला. पाण्याचे नियोजन, जंगल संवर्धन आणि सामूहिक कष्टातून उभे राहिलेले बारीपाड्याचे 'सक्सेस मॉडेल' पाहून उद्योजक भारावून गेले.
काय पाहिले उद्योजकांनी?
जलव्यवस्थापन: कमी पावसातही पाणी कसं साठवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा याचे तंत्र.
जंगल संवर्धन: गावकऱ्यांनी एकत्र येून जपलेली वनसंपदा.
स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था: स्थानिक संसाधनांवर आधारित रोजगार निर्मिती.
आयोजकांची भूमिका
या दौऱ्याचे नियोजन चेअरमन डॉ. जितेश पाठक आणि दीपक अहिरराव यांनी केले होते. "शहरातील उद्योजकांनी ग्रामीण भागातील जिद्द आणि कल्पकता आत्मसात करावी, जेणेकरून शाश्वत विकासाची नवी दारे उघडतील," असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
भविष्यात अशा अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळण्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.



Post a Comment
0 Comments