Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अजितदादांच्या राष्ट्रवादीला संपवण्याचा 'सॉफ्ट गेम'? विधानसभा विजयानंतर गडाला खिंडार पाडण्याचे षडयंत्र; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोर पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान!

 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर, हा पक्ष राज्याच्या राजकारणात मोठी भरारी घेईल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, हे कटकारस्थान अजितदादा हयात असतानाच सुरू झाले होते, असा खळबळजनक सूर आता उमटू लागला आहे.



अजितदादांच्या हयातीतच पक्षाला खिळखिळे करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्याचेच प्रत्यय म्हणून ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती आणि अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. एका बाजूला पक्षाला यश मिळत असताना दुसऱ्या बाजूला महत्त्वाच्या नेत्यांना अशा प्रकारे बाजूला करणे, हा केवळ योगायोग नसून पक्षाला कमकुवत करण्याचा एखादा 'सॉफ्ट गेम' तर नाही ना, अशी दाट शंका आता व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाची धुरा कशी सांभाळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांसारख्या आक्रमक नेत्यांसमोर निर्माण झालेली आव्हाने असोत किंवा रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या नेत्यांचे वादाच्या भोवऱ्यात अडकणे असो, या सर्व घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा सुरू आहे की, 'रात्र वैऱ्याची आहे' आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी ही बाब वेळीच गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी.

उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतानाच सुनेत्रा पवार यांना आता पक्षांतर्गत एकजूट टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादीची घोडदौड रोखण्यासाठीच हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचे बोलले जात असून, येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते या आव्हानांना कसे तोंड देतात, हे पाहणे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments