संपादकीय
नंदुरबार:गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त असल्याने या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर काल राज्य सरकारने या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविली आहे. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्याने आता प्रलंबित विकासकामांना आणि प्रशासकीय नियोजनाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नंदुरबार हा प्रामुख्याने आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथील आरोग्य, शिक्षण आणि दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका अत्यंत कळीची असते. गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवा वेग येईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. मुश्रीफ यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव पाहता ते जिल्ह्याच्या प्रश्नांना कशा प्रकारे न्याय देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments