Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा: ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष

 नवापूर (प्रतिनिधी):

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, शुक्रवारी नवापूर येथे 'मराठी भाषा गौरव दिन' अतिशय उत्साहात आणि मराठी अस्मितेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महात्मा गांधी पुस्तकालय आणि कुसुमाग्रज प्रबोधिनी, नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



प्रतिमा पूजन आणि मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पुस्तकालयाचे कार्यवाह राजेंद्र साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंतभाई शाह होते. यावेळी व्यासपीठावर राहुल साळुंखे, साहित्यिक गोपाल पवार, विजया पाटील, सरला साळुंखे, प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, साहित्यिक विजय बागुल, ग्रंथपाल सुधीर साळुंखे आणि ग्रंथालय सेवक मुकेश सांगळे उपस्थित होते.

ग्रंथ दिंडीचे विशेष आकर्षण

मराठी भाषेचा जागर करण्यासाठी सकाळी ८ वाजता एका भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात सार्वजनिक मराठी हायस्कूलचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दिंडीचे पूजन राहुल साळुंखे आणि सरला साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या मराठी साहित्यातील ग्रंथामुळे नवापूरच्या मुख्य मार्गांवर मराठी भाषेचा गौरव दिसून येत होता.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

या निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिक आणि वाचक वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती विजया पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहित्यिक विजय बागुल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक मराठी हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, महात्मा गांधी पुस्तकालयाचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, प्रबोधिनीचे सर्व सदस्य, तसेच ग्रंथपाल सुधीर साळुंखे आणि मुकेश सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments