Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिरपूर पोलिसांचा मोठा दणका! लक्झरी बसमधून होणारी २३ लाखांची गुटखा तस्करी रोखली

 सहसंपादक अनिल बोराडे 

शिरपूर (धुळे): मुंबई-आग्रा महामार्गाचा वापर करून होणाऱ्या अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित साठ्यांच्या तस्करीविरुद्ध शिरपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसवर धाड टाकून पोलिसांनी २३ लाख १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा समावेश आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सांगवी फाट्यावर सापळा

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना खात्रीलायक माहिती मिळाली होती की, इंदूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका लक्झरी बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा नेला जात आहे. या माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ हालचाली करत सांगवी फाट्याजवळ नाकाबंदी केली. संशयित बस अडवून तिची कसून तपासणी केली असता, पोलिसांना बसमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि पानमसाल्याचा साठा आढळला.

जप्त केलेला मुद्देमाल आणि कारवाई



या कारवाईत पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे:

प्रतिबंधित साठा: रजनीगंधा, तानसेन, मिराज आणि तुलसी यांसारख्या कंपन्यांचा ३ लाख १९ हजार ५१० रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखू.

वाहन: तस्करीसाठी वापरण्यात आलेली २० लाख रुपये किमतीची लक्झरी बस.

एकूण किंमत: २३ लाख १९ हजार ५१० रुपये.

चालकाला अटक; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू

या प्रकरणी बस चालक महेंद्र अनाराम चौधरी (वय ३४, रा. राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हा माल नक्की कोणी पाठवला आणि पुण्यातील कोणाला तो पोहोचवण्यात येणार होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. माल पाठविणाऱ्या आणि मागविणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाची सूत्रे: ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments