सहसंपादक अनिल बोराडे
सामोडे (पि.):पांझरा नदीच्या विलोभनीय तीरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र श्री गांगेश्वर मंदिर (चिकसे-सामोडे) येथे आज रविवार, १५ फेब्रुवारी रोजी १६ व्या वार्षिक महाशिवरात्री उत्सवाचा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे.
पहाटे संपन्न झाली भव्य महापूजा
आजच्या सोहळ्याची सुरुवात पहाटे ९:३० वाजता पिंपळनेरच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. सौ. योगिता जितेश चौरे आणि डॉ. जितेश जगदिश चौरे यांच्या हस्ते विधिवत महापूजेने झाली. यावेळी गांगेश्वर महादेव मंदिराचा परिसर 'हर हर महादेव'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
आज रात्री रंगणार स्वप्नील महाराजांचे 'जागर कीर्तन'
दिवसभर विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर, आज रात्री ९ ते ११ या वेळेत नामवंत कीर्तनकार ह.भ.प. स्वप्नील महाराज आबदाणे यांचे 'जागर कीर्तन' आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उद्या सोमवारी होणार सांगता व महाप्रसाद
आजच्या जागरानंतर उद्या सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प. गुरुवर्य रावसाहेबजी महाराज (मुकटी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नियोजनासाठी कार्यकर्त्यांची लगबग
या सोहळ्यासाठी ह.भ.प. राजेश अहिरे (भोला सर), ह.भ.प. दिपक महाराज पाटील (चौबारी) आणि गांगेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त चोख नियोजन करत आहेत. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या वतीनेही परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments