आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव; देशभक्तीपर कार्यक्रमांनी जिंकली उपस्थितांची मने
सहसंपादक अनिल बोराडे
भारतीय लोकशाहीचा गौरवशाली सोहळा असलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या गौरवाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मान्यवरांची उपस्थिती आणि ध्वजारोहण
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर ए.पी.आय. किरण बर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव श्री. रा. ना. पाटील यांनी भूषविले.
याप्रसंगी साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. मंजुळाताई तुळशीराम गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. संभाजीराव अहिरराव, उपाध्यक्ष श्री. श्याम शेठ कोठावदे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नानासो ज्ञानेश्वर एखंडे, नगरसेवक श्री. गणेश खैरनार, नगरसेविका श्रीमती शोभाताई नेरकर, सामाजिक कार्यकर्ते पी.एस. दादा, देवेंद्रभाऊ कोठावदे, शाम दुसाने, मगन अहिरे, पत्रकार सुभाष जगताप, भरत बागुल आणि मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटील मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष सन्मान
शाळेसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाची दखल घेत आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते यशस्वी खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट दिल्लीपर्यंत मारलेली मजल सर्वांसाठी कौतुकास्पद ठरली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य आणि नाटिका सादर केल्या. चिमुकल्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधान आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
आपल्या भाषणात आमदार मंजुळाताई गावित आणि अध्यक्ष रा. ना. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी देशाचे सुजाण नागरिक बनावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments