Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळ्याच्या १० व्या महापौर पदाचा मान 'खुल्या' प्रवर्गातील महिलेला; भाजपमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग!

 धुळे | सहसंपादक अनिल बोराडे 

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण अखेर आज मुंबईतील मंत्रालयात जाहीर झाले. राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत निघालेल्या या सोडतीत धुळ्याचे महापौर पद 'सर्वसाधारण महिला' (Open Female) गटासाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयामुळे धुळे महापालिकेत आता १० व्या महापौर म्हणून कोणत्या महिला नगरसेविकेची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



भाजपच्या २७ महिला नगरसेविकांमध्ये 'रेस' सुरू

धुळे महापालिकेत ७४ पैकी ५० जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सभागृहात एकूण ४१ महिला नगरसेविका असून, त्यातील तब्बल २७ महिला नगरसेविका भाजपच्या आहेत. आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी निघाल्याने आता भाजपमधील ज्येष्ठ आणि अनुभवी महिला नेत्यांमध्ये महापौर पदाच्या माळेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

या नावांची आहे जोरदार चर्चा:

महापौर पदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज महिलांची नावे आघाडीवर आहेत. यात प्रामुख्याने:

 * अनुभवी माजी महापौर: जयश्रीताई अहिरराव, कल्पनाकाकू महाले आणि प्रतिभाताई चौधरी.

 * ज्येष्ठ नगरसेविका: विक्की परदेशी यांच्या मातोश्री मायादेवी परदेशी.

 * अनुभवी चेहरे: माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, दुसऱ्यांदा विजयी झालेल्या सुरेखाताई उगले आणि वंदना भामरे.

 * माजी सभापती: किरणताई कुलेवार आणि सारिका अग्रवाल.

या अनुभवी नेत्यांमधून पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २९ महापालिकांचे चित्र स्पष्ट

मंत्रालयातील सोडतीनुसार, राज्यातील २९ महापालिकांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये:

 * अनुसूचित जमाती: १ जागा

 * अनुसूचित जाती: ३ जागा

 * ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग): ८ जागा

 * सर्वसाधारण (Open): १७ जागा

इतर शहरांची स्थिती:

धुळ्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि नाशिक या महापालिकांवरही खुल्या प्रवर्गाचा महापौर विराजमान होणार आहे. तर जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर पदाचा मान मिळणार आहे.

सत्तेचे समीकरण आणि राजकीय पेच

१५ जानेवारीला झालेले मतदान आणि १६ जानेवारीच्या निकालात भाजपने धुळ्यात निर्विवाद वर्चस्व राखले आहे. आता आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय गोटात हालचालींना वेग आला असून, 'किंगमेकर' कोणाच्या गळ्यात ही माळ टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. धुळ्याच्या इतिहासात आतापर्यंत ९ महापौर झाले असून, ही १० वी संधी पुन्हा एकदा महिलेला मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments