सहसंपादक अनिल बोराडे
♿️ दिव्यांग पत्रकाराला शिवीगाळ, 'हातपाय तोडण्याची' धमकी आणि पत्रकारावर हल्ला केल्याचा आरोप; तातडीने निलंबनाची मागणी
साक्री: साक्री पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) महेश गायतड यांच्या कायद्याच्या नावाखाली चाललेल्या दादागिरी आणि गुंडगिरी विरोधात साक्री शहरातील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल आणि पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याच्या गंभीर घटनेनंतर साक्रीतील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत धुळे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संजय बांबळे यांना निवेदन दिले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
* दिव्यांग पत्रकाराला शिवीगाळ: साक्री येथील पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी PSI गायतड यांचा शाब्दिक वाद झाल्यानंतर पत्रकार किशोर गादेकर हे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गायतड यांना भेटले. यावेळी गायतड यांनी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना "तो एक लंगड्या आहे, त्याचा दुसरा पायही तोडेल," अशी अत्यंत अश्लील आणि संतापजनक शिवीगाळ केली. गायतड यांनी नंतर शिवीगाळ केल्याचे मान्यही केले.
* पत्रकारावर हल्ला: याच वेळी पत्रकार उमाकांत अहिरराव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, PSI महेश गायतड यांनी अचानक आपले शर्ट काढून गुंडगिरीच्या पद्धतीने अहिरराव यांच्यावर हल्ला केला.
पत्रकारांची तीव्र भूमिका:
PSI गायतड यांच्या या कृत्यामुळे साक्रीतील पत्रकार संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेची दखल घेत साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री प्रेस क्लब, जन ग्रामीण पत्रकार संघ आणि इतर संघटनांनी एकत्र येत DYSP संजय बांबळे यांना निवेदन दिले.
निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, फौजदार महेश गायतड यांनी दिव्यांग पत्रकाराच्या व्यंगावर टीका करून हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. समाजात पोलिसांचे असे वागणे अत्यंत चुकीचे आहे.
या आहेत पत्रकारांच्या प्रमुख मागण्या:
* फौजदार महेश गायतड यांच्याविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी.
* त्यांना त्वरित निलंबित करावे.
* या घटनेची दखल धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घ्यावी.
इशारा: जर गायतड यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघ साक्री शहरात मोर्चा काढून शहर बंद करेल आणि उपोषणाला बसेल, असा इशारा यावेळी DYSP संजय बांबळे यांना देण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती:
यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले, साक्री प्रेस क्लबचे माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते धीरज देसले, साक्री तालुका प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार जी. टी. मोहिते, जन पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश वाघ, ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे यांच्यासह साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments