सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: पिंपळनेर वनपरिक्षेत्र आणि आसपासच्या परिसरात बिबट्या या वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने मानव-बिबट संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेऊन, वन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून येथे 'मानव-बिबट सहजीवन जनजागृती अभियान' आणि 'शून्य सर्पदंश जनजागृती अभियान' चा संयुक्तपणे दमदार शुभारंभ करण्यात आला आहे.
धुळ्याच्या वनसंरक्षक श्रीम. निनू सोमराज, उपवनसंरक्षक श्री. मो.बा. नाईकवाडी आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री. योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार शं. ढोले यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
नुकताच पापडीपाडा गावामध्ये या जनजागृती रथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून वन विभागाच्या या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
अभियानाचे उद्दिष्ट आणि स्वरूप
या दुहेरी जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश बिबट्या आणि सर्पदंशामुळे होणारे मानवी आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान टाळणे आहे. या मोहिमेअंतर्गत, ग्रामस्थांना बिबट्याशी संघर्ष कशा प्रकारे टाळता येईल, बिबट्याचा वावर असलेल्या भागात कोणती काळजी घ्यावी, तसेच सर्पदंशातून बचाव कसा करावा आणि तातडीने उपचार काय करावेत याबद्दल सखोल प्रबोधन केले जाणार आहे. यामुळे नागरिक तसेच पाळीव प्राणी यांच्या जिविताचे रक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
पापडीपाडा येथील उद्घाटन प्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार ढोले यांच्यासह वनपाल श्री. रामदास चौरे, श्री. दयाराम सोनवणे, वनरक्षक श्री. दिपक राठोड, श्री. अनिल घरटे, श्री. इनेश पावरा, श्री. राकेश पावरा, श्री. आकाश पावरा, श्री. रविंद्र माळचे, तसेच महिला कर्मचारी श्रीम.सोनाली पावरा, श्रीम. रंजना पावरा, श्रीम. ममता पावरा, श्रीम. सपना पावरा आदी उपस्थित होते. याशिवाय, जेएफएम (JFM) समिती अध्यक्ष श्री. अशोक चौरे आणि सदस्य श्री. जगन चौरे, श्री. केशव चौधरी, श्री. रामचंद्र चौरे, श्री उज्जैन चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वन विभागाने सुरू केलेल्या या व्यापक जनजागृतीमुळे पिंपळनेर परिसरातील मानव-वन्यजीव सहजीवनाच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
Post a Comment
0 Comments