Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवशाहीचे आधुनिक स्वरूप म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक परिवर्तन – अँड.विजय नवल पाटील

 सहसंपादक अनिल बोराडे 

नवी दिल्ली येथे मराठा सेवा संघाच्या उत्तर भारतातील पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी गढवाल भवन,करोल बाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर व राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर भव्य स्वरूपात पार पडले.शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री अँड.विजय नवल पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीप पाटील होते. व्यासपीठावर राष्ट्रीय शेतकरी नेते अविनाश काकडे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील, समन्वय कक्ष प्रमुख कमलेश पाटील,न्यायदान कक्षाचे अध्यक्ष अँड.आकाश काकडे, प्रबोधन कक्षाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी राजे पाटील,प्रा. संभाजी नवघरे,प्रा.सुदर्शन तारख,तसेच विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात राष्ट्रवाद, सामाजिक ऐक्य,अंधश्रद्धा निर्मूलन,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर मार्गदर्शन झाले. प्रमुख प्रशिक्षक प्रा.शिवाजी राजे पाटील,प्रा.संभाजी नवघरे व प्रा.सुदर्शन तारख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून विचारमंथन घडवले.



शिबिरादरम्यान मराठा सेवा संघाचे वार्तापत्राचे प्रकाशन अँड. विजय नवल पाटील यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“सेवा संघाच्या उपक्रमांमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन व पुरोगामी विचार रूजत आहेत. जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत युवकांमध्ये वाचन, लेखन, वकृत्वाची आवड निर्माण होत आहे.हेच शिवशाहीचे आधुनिक स्वरूप म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक परिवर्तन आहे.”

राष्ट्रीय शेतकरी नेते अविनाश काकडे म्हणाले, “जर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी घोडा-तलवारीऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समाजहितासाठी स्वीकारली असती.”अध्यक्षीय भाषणात प्रदीप पाटील यांनी सांगितले की, सेवा संघाच्या कार्यामुळे युवकांमध्ये शिक्षण, उद्योग व स्पर्धा परीक्षांविषयीची जाणीव वाढत असून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता दृढ होत आहे.

शिबिरातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियलला भेट देऊन अत्याधुनिक १३-डी तंत्रज्ञान व डार्क राईडच्या माध्यमातून साकारलेले प्रेरणादायी देखावे अनुभवले.या दोन दिवसीय शिबिरातून कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा,राष्ट्रभावना व संघटनात्मक दृढता निर्माण झाली असल्याचा विश्वास राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केला.



शिबिरात मनिषा राणे,सुमन मराठा,राजश्री मुळे,डॉ.कुसुम गंगवार,भगवान वडजे आदींनी विशेष योगदान दिले. नवीन पदनियुक्त्यांमध्ये सुमन मराठा व सृष्टी चव्हाण यांची जिजाऊ ब्रिगेड दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी,तर मनोज सोमवंशी व मनोज सुर्यवंशी यांची दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. श्री राजेंद्र सिंह यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संयुक्ता देशमुख यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.आदेश मुळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments