नवापूर, ७ ऑगस्ट, २०२५ – नवापूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना नवापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
घटनेचा तपशील
नवापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महात्मा गांधी पुतळ्या जवळील एटीएममध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या. रात्रीची गस्त घालत असताना, पोलिसांनी एटीएमजवळ पोहोचताच काही लोक पळून गेले. पोलिसांनी तपासणी केली असता, एटीएम मशीन तोडल्याचं आणि त्यातील सेन्सर वायर तुटल्याचं दिसून आलं.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरात राज्यातील उच्छल येथील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये चार प्रौढ आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून एटीएम फोडण्यासाठी वापरलेलं साहित्य आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
आरोपींची नावे:
१)सुमितभाई डॅनियलभाई गमीत (१८, रा. भिंता खुर्द, गुजरात)
२)जस्टिन कुमार दिलीपभाई गमीत (१८, रा. भिंता खुर्द, गुजरात)
३) जतिन मोना गमित (१९, रा. रावजीबुधा, गुजरात)
५)गणेशभाई जीवन गमित (१९, रा. रावजीबुधा, गुजरात)
दोन विधी संघर्षग्रस्त बालके (अल्पवयीन असल्याने नावे जाहीर केली नाहीत)
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पुढील तपास करत आहेत. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस. यांनी नवापूर पोलीस पथकाचं कौतुक केलं आहे.
नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नवापूर पोलिसांनी नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे अशा घटनांना आळा घालण्यास मदत होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आहे.
Post a Comment
0 Comments