सहसंपादक अनिल बोराडे
मुंबई: विदर्भातील अकोला येथील मूळचे रहिवासी असलेले, पण संगमनेर येथे ४ जुलै १९६० रोजी जन्मलेले देवेंद्र भुजबळ हे आज पत्रकारिता, लेखन आणि माध्यम क्षेत्रात एक आदरणीय नाव बनले आहेत. शालेय जीवनात गणित आणि विज्ञान विषयांची नावड आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दहावीत नापास होऊनही, त्यांनी हार मानली नाही. पुण्यात येऊन, गोळे सरांच्या मदतीने त्यांनी दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यानंतर, एक-दोन नव्हे, तर तीन वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये शिकून त्यांनी पदवी संपादन केली आणि आपली आवड ओळखून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव असूनही, देवेंद्र भुजबळ यांनी विचारपूर्वक माध्यम क्षेत्राची निवड केली. नगर येथील दैनिक समाचारमध्ये उपसंपादक कम वार्ताहर, पुणे येथील दैनिक केसरीमध्ये उपसंपादक, आणि साप्ताहिक सह्याद्रीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.
दूरदर्शन आणि महाराष्ट्र शासनातील महत्वपूर्ण योगदान
भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता म्हणून सहा वर्षांच्या सेवाकाळात भुजबळ यांनी अनेक कार्यक्रम, माहितीपट, आणि दूरदर्शन वृत्तांत निर्माण केले. त्यांनी संहिता लेखन केले आणि विविध कार्यक्रमांच्या निर्मितीत सक्रिय योगदान दिले. दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आल्यावर, त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक आणि संचालक म्हणून महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.
दूरदर्शनवरील "शिवशाही आपल्या दारी" या २४ भागांच्या मालिकेच्या, सोमवार ते शुक्रवार अशा दीड वर्षे प्रसारित झालेल्या "माय मराठी" कार्यक्रमाच्या, तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रसंगी योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी दूरदर्शनवर चालविल्या गेलेल्या मोहिमेच्या निर्मिती आणि प्रसारणात त्यांनी समन्वयक अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. दूरदर्शनच्या गाजलेल्या "महाचर्चा" कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन होते, तर आकाशवाणीवरील महाराष्ट्र शासनाच्या "दिलखुलास" कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे ते टीमलीडर होते. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी त्यांनी ‘करिअरनामा’ हे सदर सुरू केले, ज्यासाठी ते स्वतः नियमित लेखन करत असत. त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत होते.
जागतिक स्तरावर व्याख्याने आणि संशोधनपर लेखन
देवेंद्र भुजबळ यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता" या विषयावर दिलेले व्याख्यान विशेष गाजले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. अमेरिकेत असताना, शिकागो मराठी मंडळाने त्यांच्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ते विविध विषयांवर सातत्याने लिहीत असतात आणि व्याख्याने देत असतात. त्यांचा "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता" हा संशोधनपर लेख मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, आणि उर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे.
सन्मान आणि साहित्य निर्मिती
देवेंद्र भुजबळ हे पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रा. एल. एन. गोखले पाठ्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले, तर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवीत ते प्रथम श्रेणीत पहिले आले. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सभासदत्व बहाल करण्यात आले. तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते "आम्ही अधिकारी झालो" या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्कृष्ट पोर्टलचे संपादक म्हणून त्यांना "चौथा स्तंभ" हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
त्यांची "भावलेली व्यक्तिमत्वे", "गगनभरारी", "प्रेरणेचे प्रवासी", "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता", "करिअरच्या नव्या दिशा", "अभिमानाची लेणी", "समाजभूषण", "आम्ही अधिकारी झालो" ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर "माध्यम भूषण" हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. शासकीय सेवेत असताना त्यांनी शासनाच्या विविध प्रकाशनांचे संपादन केले. निवृत्तीनंतर न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्ससाठी त्यांनी "जीवनप्रवास", "समाजभूषण २", "मी, पोलीस अधिकारी", "पौर्णिमानंद" (काव्यसंग्रह), "अजिंक्यवीर", "अंधारयात्रीचे स्वप्न", "चंद्रकला" (कादंबरी), "हुंदके सामाजिक वेदनेचे", "मी शिल्पा, सत्तरीतील सेल्फी" या पुस्तकांचे संपादन केले आहे.
सेवाभावी वृत्ती आणि कौटुंबिक साथ
सेवाभावी देवेंद्र भुजबळ साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, दूरदर्शन आणि प्रसारमाध्यमांमध्ये सतत कार्यरत असतात. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते कार्य करतात. क्षणिक प्रतिकूल परिस्थितीमुळे निराश न होता, जिद्दीने माणूस पुढे कसा जात राहील, यासाठी देवेंद्र भुजबळ हे आपली वाणी, लेखणी आणि प्रत्यक्ष मदतीद्वारे सतत प्रयत्न करत आले आहेत.
या कार्यात त्यांची पत्नी सौ. अलका भुजबळ त्यांना मोलाचे सहकार्य करतात. सौ. अल अलका भुजबळ यांचे "कॉमा" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्यात त्यांनी कर्करोगावर यशस्वीरित्या मात केल्याचे प्रेरणादायी अनुभव कथन केले आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये राहणारे देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलका भुजबळ हे जोडपे "न्यूज स्टोरी टुडे पोर्टल" या प्रसारमाध्यमातून अनेकांच्या सामाजिक कार्याला प्रसिद्धी देत आहेत.
देवेंद्र भुजबळ, सौ. अलका भुजबळ आणि त्यांची कन्या देवश्री यांच्या या सामाजिक कार्याला सलाम! त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना प्रतिकूलतेवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करेल.
Post a Comment
0 Comments