सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार, १६ जुलै २०२५: कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी एकरी झाडांची संख्या महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील पीक संरक्षण तज्ज्ञ श्री. पद्माकर कुंदे यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील कोठडा येथे आयोजित विशेष कापूस प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कापसाची घनलागवड आणि त्यानंतर 'दादा लाड तंत्रज्ञाना'चे महत्त्व विषद केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, नंदुरबार यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात 'विशेष कापूस प्रकल्प' राबवला जात आहे. या प्रकल्पात नंदुरबार तालुक्यातील कोठडा, वाघशेपा, आर्दीतारा, पावला आणि मंगरूळ या गावांमध्ये 'दादा लाड तंत्रज्ञाना'चे प्रात्यक्षिक सुरू आहे. याच प्रकल्पांतर्गत समाविष्ट शेतकऱ्यांसाठी कापूस पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला इंडियन ग्रामीण संस्थेचे श्री. यश सोनवणे यांनी 'दादा लाड तंत्रज्ञाना'चा शास्त्रीय पद्धतीने अवलंब केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य असल्याचे सांगितले.
तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करताना श्री. पद्माकर कुंदे यांनी कापूस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी 'दादा लाड तंत्रज्ञाना'ची सविस्तर माहिती दिली. तसेच, कापसातील किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कमी कालावधीचे व रोग-किडींना प्रतिकारक वाण वापरणे, सापळा पिके लावणे, कामगंध सापळ्यांचा वापर करणे, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा उपयोग करणे, पिकावरील महत्त्वाचे रोग, त्यांची लक्षणे आणि एकात्मिक व्यवस्थापनाचे महत्त्व यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. संदीप कुवर यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कोठडा गावचे माजी सरपंच श्री. जयंत वसावे यांनी शेतकऱ्यांना 'दादा लाड तंत्रज्ञाना'चा योग्य वापर करून आपले कापूस उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि शेतकऱ्यांनी गावातील श्री. दासू नकुल पाडवी यांच्या 'दादा लाड तंत्रज्ञाना'च्या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. या भेटीवेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. पद्माकर कुंदे, इंडियन ग्रामीण संस्थेचे श्री. यश सोनवणे व त्यांचे सहकारी, विशेष कापूस प्रकल्पाचे श्री. दुर्गाप्रसाद पाटील व श्री. संदीप कुवर, तसेच लुपिन फाऊंडेशनचे श्री. गांगुर्डे आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments