सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील उंभरे गावात गेल्या १५ वर्षांपासून दारूबंदी असतानाही, गावात पुन्हा अवैध गावठी दारू विक्री सुरू झाल्याने महिलांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने महिलांनी ग्रामपंचायत आणि साक्री पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
उंभरे गावात अनेक वर्षांपासून दारूबंदी होती, मात्र हळूहळू गावाच्या वेशीवर आणि त्यानंतर गावातच दारूचे अड्डे सुरू झाले. ही दारू केमिकल मिश्रित असल्याने तरुणाईच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करत आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने गावातील महिलांनी तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्यांसह एकत्र येत याविरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी, उंभरे गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी उपस्थित पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना महिलांनी एक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी, गावात सुरू असलेली अवैध आणि केमिकल मिश्रित दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.
ग्रामपंचायतीवरील मोर्चानंतर, सर्व महिला, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी थेट साक्री पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक वळवी साहेब यांना निवेदन देऊन, दारू विक्रेत्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक वळवी यांनी महिला आणि ग्रामस्थांना आश्वासन दिले की, गावठी दारू विकणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.
Post a Comment
0 Comments