सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर, साक्री: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रेरणा मेळावा पिंपळनेर, साक्री येथील कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व शाखांमधून सुमारे ५० कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र अंनिसच्या पिंपळनेर शाखेने या मेळाव्याचे यशस्वी संयोजन केले.
या मेळाव्याला महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव विनायक सावळे, निधी व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. परेश शाह, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रदादा मराठे आणि डॉ. शरद वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भूषण पाटील, जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे आणि प्रा. संदीप गिरासे, सुरेश पारख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे, निमगुळ, सामोडे, पिंपळनेर, शिंदखेडा, वाघाडी, साक्री, कासारे, दहिवेल या शाखांचे एकूण ५० कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात प्रा. रणजीत शिंदे, विनायक सावळे आणि प्रा. संदीप गिरासे यांनी 'मानवता जपा' हे गीत सादर करून केली. उद्घाटन सत्रात प्रा. भूषण पाटील यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश आणि दिवसभराच्या कामकाजाची रूपरेषा स्पष्ट केली. पिंपळनेर शाखेच्या वतीने मराठे आप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि पिंपळनेर शाखेची स्थापना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या उपस्थितीत झाल्याची आठवण करून दिली. त्यानंतर विनायक सावळे यांनी शहादा येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीचा सविस्तर वृत्तांत सादर केला.
या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. दुपारच्या सत्रात येत्या तीन महिन्यातील कामकाजाचे शाखानिहाय नियोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने पुढील दोन महिन्यांत करावयाच्या शाखा भेटींचे नियोजन करण्यात आले. लैंगिकता प्रबोधन सप्ताह, सर्प विज्ञान सप्ताह, ९ ऑगस्ट स्थापना दिवस, २० ऑगस्ट शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा बलिदान दिवस, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण व स्वयंअध्ययन परीक्षा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच वार्षिक विशेषांकासाठी जाहिराती व देणग्या संकलन या महत्त्वाच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
या मेळाव्यात साक्री शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. दिलीप लोखंडे यांच्या "लोकसंवादक - संत कबीर" या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. चळवळीचे पाठीराखे ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले यांच्या स्मृतींनाही अभिवादन करण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पिंपळनेर शाखेचे ए.बी. मराठे, व्ही.एन. जीरे पाटील, शिरीष कुवर, देविदास कुवर, प्रा. मीनाक्षी माळी, मनीषा भदाणे, छाया वाडेकर, ललिता जाधव, रेखा पाटील, ललित मराठे, सुभाष जगताप, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, देविदास पाटील, डी.डी. महाले यांनी विशेष परिश्रम घेतले. 'हम होंगे कामयाब' या गीताने मेळाव्याची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments