Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवप्रविष्ठ पोलीसांची सर्वसामान्यांशी वर्तणूक न्यायपूर्ण असावी: विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे,  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित १२ व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना, त्यांची सर्वसामान्यांशी वागणूक न्यायपूर्ण आणि सहकार्याची असावी असे प्रतिपादन केले. पोलीस दलात कर्तव्यदक्ष, निर्भय आणि धैर्यशील पोलीस म्हणून समाविष्ट होणाऱ्या या प्रशिक्षणार्थींनी कोणत्याही प्रकारचे पक्षपाती वर्तन न करता समाजाचे खरे पहारेकरी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.



धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्यात सत्र क्रमांक १२ मधील ६४५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपप्राचार्य राहुल फुला आदी मान्यवर उपस्थित होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. कराळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचा दिवस या ६४५ तेजस्वी, प्रामाणिक आणि निष्ठावान पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी दैदीप्यमान, गौरवास्पद आणि अविस्मरणीय आहे. हा केवळ प्रशिक्षणाचा शेवट नसून, एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे. त्यांनी कठोर परिश्रम, अपार मेहनत आणि अद्वितीय शिस्तीच्या बळावर हे स्थान प्राप्त केल्याचे गौरवले. पोलीस वर्दी हा केवळ पोशाख नसून, ती जबाबदारी, निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक आहे. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून, समाजाच्या सुरक्षेचा आणि अभेद्यतेचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

श्री. कराळे यांनी पुढे म्हटले की, नवप्रविष्ठ पोलिसांचे कार्य केवळ गुन्हेगारीला आळा घालणे नसून, समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची भक्कम ताकद बनणे हे आहे. संकटाच्या काळात जनतेच्या आशेचा प्रकाश आणि विश्वासाचा कणखर आधार बनण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती, व्यापारी संघटना, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी नियमित संपर्क ठेवण्याचे महत्त्व सांगितले. अशा व्यक्तींकडून चांगल्या-वाईट घटनांची माहिती मिळते आणि तणावाचे प्रसंग हाताळण्यास त्यांची मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.



अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या व्यापक प्रसारामुळे प्रचंड सामाजिक जागृती झाली आहे. यामुळे एखाद्या घटनेचे पडसाद कोठे आणि कसे उमटतील हे सांगता येत नाही, तसेच सोशल मीडियावरील त्वरित प्रतिक्रिया कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी सदैव सतर्क आणि चौकस राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शहरात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या व संवेदनशील घटनांचा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करण्याची सवय मनाला लावल्यास अनेक कायदा व सुव्यवस्थेचे प्रसंग टाळता येतील, असे ते म्हणाले.

शपथेस कटिबद्ध राहा: श्री. कराळे यांचे आवाहन

देशाच्या सुरक्षिततेसाठी, कायद्याच्या रक्षणासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी अखंड निष्ठेने कार्य करण्याची शपथ प्रशिक्षणार्थींनी घेतली आहे. नागरिकांच्या रक्षणाची, कायद्याच्या पालनाची आणि सामाजिक न्यायाची ही शपथच त्यांची खरी ओळख आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय प्रामाणिकपणाने, निःस्वार्थ भावनेने आणि समाजहिताच्या व्यापक दृष्टिकोनाचा असावा. संकटाला सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तत्पर आणि कर्तव्यपूर्तीसाठी निष्ठावान राहण्याचे आवाहन श्री. कराळे यांनी केले.

प्रशिक्षण केंद्राची कामगिरी: प्राचार्य विजय पवार

पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. पवार यांनी धुळे केंद्राची माहिती देताना सांगितले की, येथे महाराष्ट्र पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत १२ पोलीस प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून, त्यात ४ हजार ३८५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी आणि ३ सत्रांमध्ये १ हजार ३५ होमगार्ड यांनी मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त ८८२ कवायत निदेशक कोर्स, इंडक्शन कोर्स अंतर्गत १ हजार ८२१ पोलीस उपनिरीक्षक आणि प्रोफेशन स्किल अपग्रेडेशन अंतर्गत २ हजार ३५ प्रशिक्षणार्थींना सेवांतर्गत प्रशिक्षण असे एकूण १० हजार १५८ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या १२ व्या सत्रात भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त रुजवण्यासाठी पद व शस्त्र कवायत शिकवण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था, दहशतवाद व घातपात यांसारखे महत्त्वाचे प्रसंग हाताळणे, गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी लाठी व शस्त्र हाताळणी, गोळीबार, कराटे, जमाव नियंत्रण आणि कमांडो यांचेही प्रशिक्षण दिले आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योगाभ्यास देखील शिकविण्यात आला आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केंद्राच्या ग्रंथालयात कायदा व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसह विविध कथा, कादंबऱ्या, असे एकूण ५ हजार ८३४ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्यनुसार कार्य करण्यासाठी प्रशिक्षणार्थी सज्ज झाले असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

सामान्य कुटुंबातून आलेले हे सर्व प्रशिक्षणार्थी आज एका शिस्तबद्ध पोलीस खात्यात जनतेला सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध दीक्षांत संचलनातून त्यांनी हे दाखवून दिले आहे. जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आमचे प्रशिक्षणार्थी शिस्तीचे अनुकरण करून धैर्य, विवेक, सामर्थ्य, सचोटी व प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडून या संस्थेसह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाची कीर्ती व नावलौकिक वाढवतील, असे विश्वास श्री. पवार यांनी शेवटी व्यक्त केला.

उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा सत्कार

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र १२ मधील विजेत्या प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये बेस्ट टर्न आऊट ऋषिकेश मठकर (सिंधुदुर्ग), आंतरवर्ग प्रथम सुर्यभान पाटील (जळगाव), बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगाव), गोळीबार प्रथम शरद कोंड (नाशिक ग्रामीण), कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगाव), बेस्ट ड्रील (पद व शस्त्र) जितेंद्र मोरे (मीरा भाईंदर), सर्वोत्कृष्ट खेळाडू अमर क्षिरसागर (सोलापूर ग्रामीण) तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुर्यभान पाटील (जळगाव) यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ आणि दीक्षांत संचलन परेडने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कच्छवा यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल फुला यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments