सहसंपादक:अनिल बोराडे
साक्री, सामोडे (धुळे): साक्री तालुक्यातील दि. गांगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या नूतन विद्यामंदिर, सामोडे येथील १९६४ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल ६१ वर्षांनी एकत्र येऊन 'स्नेहमीलन सोहळा' मोठ्या उत्साहात साजरा केला. २५ मे रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वयाचा अमृत महोत्सव साजरा करत, बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
दिग्गजांची उपस्थिती आणि गौरवशाली इतिहास
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. शंकर नाना शिंदे होते, तर विनायकराव देवरे आणि दिगंबर घरटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यालयाचे स्वर्गवासी झालेले संचालक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी, तसेच पहेलगाम येथील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एन. घरटे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा इतिहास कथन करत, संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याचे आणि ६१ वर्षांनी एकत्र येऊन शाळेच्या प्रांगणात 'अमृत महोत्सव' साजरा केल्याचे सांगितले.
माजी विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल
या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थी शिवाजीराव दहिते यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे, तर दर्यावरगीर महंत ऊर्फ कैलास नाना यांनी जिल्हा बँकेचे संचालक तसेच अध्यक्षपद भूषवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. याशिवाय, इतर माजी विद्यार्थ्यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, शेतकी संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. डॉ. विलास भदाणे आणि रमेश घरटे यांनी क्लास वन अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्नेहमीलन आणि आठवणींचा सोहळा
या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते आणि जिल्हा बँक संचालक कैलास नाना महंत, श्रीमती इंदुमाई व श्रीमती निर्मलाताई यांनी शाल-श्रीफळ देऊन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव शिंदे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह परिचय करून दिला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. विजयराव सोनवणे यांनी प्रार्थना, गीत आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र अभिनयासह सादर केले. अनेक माजी विद्यार्थ्यांची मुले-मुली उच्चशिक्षित असून इंजिनियर, डॉक्टर, वकील, कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर काही राजकारणात सक्रिय आहेत. डॉ. विलास भदाणे यांची मुलगी सामाजिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर आहे.
अध्यक्षांकडून शुभेच्छा
या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शंकरराव शिंदे म्हणाले की, "आज या शाळेचे माजी विद्यार्थी उच्च स्थानावर असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणारे विद्यार्थी याच शाळेचे असणे, हा शाळेचा बहुमान आहे." त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उर्वरित आयुष्य निरोगी व आनंदी जावो, अशा शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजीराव दहिते यांनी मानले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी निळकंठ बदाने, पी. एन. पाटील, विजयराव सोनवणे, तसेच विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी मनोज घरटे, आर. पी. देसले, वाय. आर. कुवर, आर. एन. घरटे यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments