नंदुरबार: '100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम' अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सात कार्यालयांचा नुकताच गौरव करण्यात आला. यात नंदुरबारचे उपविभागीय कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर धडगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल वळवी आणि शहादाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश पाटील यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकासाठी अक्राणीचे तालुका कृषी अधिकारी आ. शिंदे, अक्कलकुवाचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार नवले, नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तळोद्याचे उपअभियंता (सार्व. बांधकाम) नितीन गोसावे यांची निवड झाली.
यासोबतच, नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांनी परभणी येथे कार्यरत असताना एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करून आरोपींना शिक्षा मिळवून दिली, या प्रशंसनीय कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
क्रीडा क्षेत्रातही नंदुरबारच्या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. मिशन हायस्कूलचे सौरभ राजपूत आणि प्रणव गावित यांनी India Youth Games 2025 मध्ये महाराष्ट्र रग्बी संघाचे प्रतिनिधित्व करताना पदक जिंकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील या सर्व सन्मानप्राप्त अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या योगदानाने नंदुरबार जिल्ह्याची मान उंचावली आहे.
Post a Comment
0 Comments